Advertisement

संप पडला महागात, एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार


संप पडला महागात, एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार
SHARES

वेतनवाढीसाठी संपाचं हत्यार उपसत सलग ४ दिवस संप करणं एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चांगलं महागात पडलं आहे. कारण या एसटी कर्मचाऱ्यांचा ४ दिवसांचा नव्हे, तर चक्क ३६ दिवसांचा पगार कापण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने ३६ दिवसांचा पगार कापण्याचे आदेशही महामंडळाने प्रत्येक विभागाला दिले आहेत.

राज्यभरातील एसटी कर्मचारी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले होते. एेन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी संप केल्याने प्रवाशांच्या दिवाळीचं वाटोळं झालंच; पण दुसरीकडे एसटीला ४ दिवसांत अंदाजे १२५ कोटीचं नुकसान सहन करावं लागलं. संप मिटावा म्हणून एसटी महामंडळ, परिवहन मंत्री इतकेच काय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनीही प्रयत्न केले. पण कर्मचारी संपावर ठाम होते.


न्यायालयाचा दणका

संप मागे घेण्यासाठी अखेर एसटी महामंडळाने थेट उच्च न्यायालयातच धाव घेतली. न्यायालयानेच संपकऱ्यांना दणका देत संप बेकायदेशीर ठरवत त्वरीत कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासांतच संप मागे घेण्यात आला. त्याचवेळी न्यायालयाने संपकऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेश देत कर्मचाऱ्यांना मोठा धक्काही दिला.

न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाने नुकसान भरपाई वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संप काळातील ४ दिवसांचा पगार कापणार असल्याची माहिती एसटीच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.


असा कापणार पगार

संप ४ दिवस झाल्याने ४ दिवसांचाच पगार कापण्याएेवजी ३६ दिवसांचा पगार का कापला जात आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचं उत्तर असं आहे की, एसटी महामंडळाच्या ५ जानेवारी २००५ च्या एका परिपत्रकानुसार नुकसान भरपाईच्या वसुलीबाबतचे नियम ठरवण्यात आले आहेत. या नियमानुसार एका दिवसाच्या नुकसान भरपाईसाठी ८ दिवसांचा पगार कापण्याची तरतूद आहे. त्यानुसार ४ दिवसाप्रमाणे ३२ दिवसांचा पगार आणि संपाच्या काळातील ४ दिवसांचा पगार असा एकूण ३६ दिवसांचा पगार कापला जाणार आहे.


कर्मचारी संघटना न्यायालयात जाणार

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नुकसान भरपाई कापली जाणार आहे. पण आम्ही या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेणार आहोत.

-संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा