SHARE

ऐन गर्दीच्या वेळेस रूळांना तडे जाण्यासोबतच रुळांवर रुळ ठेवून घातपात घडवून आणण्याचे प्रकार उघडकीस आल्याने रेल्वे प्रशासन याप्रकरणी अधिक दक्ष झाले आहे. अशा घटनांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होऊन रेल्वे प्रवाशांची सुरक्षितताही धोक्यात आल्याने रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळांची आधुनिक पद्धतीने तपासणी करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मध्य रेल्वे प्रशासन मध्य आणि हार्बर मार्गावरील रुळांची तपासणी अल्ट्रासॉनिक यंत्रणेचा वापर करुन करणार आहे.

गुरुवार - शुक्रवार आणि सोमवार - मंगळवारच्या मध्यरात्री अल्ट्रासॉनिक पद्धतीचा वापर करुन ही तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत रुळांमध्ये बिघाड असल्यास तात्काळ हा बिघाड दिसेल. त्यानंतर जागेवरच रुळ दुरूस्ती करणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे..

ट्रान्सहार्बर मार्गावर गुरुवार - शुक्रवारच्या मध्यरात्री नेरुळ ते ठाणे दरम्यान ही तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता विशेष लोकल चालविण्यात येणार असून मध्यरात्री 2.15 वाजता ही लोकल ठाण्याच्या दिशेने रवाना करण्यात येईल. ही लोकल 2.45 वाजता ठाणे स्थानकात दाखल होईल. तर मध्यरात्री 2.55 वाजता ही लोकल परतीच्या प्रवासाला निघून ती नेरुळ स्थानकात 3.25 वाजता दाखल होणार आहे.

हार्बर मार्गावर देखील वाशी - वडाळा - पनवेल दरम्यान रुळांची तपासणी करण्यात येणार आहे. सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री 1.00 वाजता ही लोकल वाशी स्थानकातून रवाना करण्यात येणार असून ही लोकल 1.30 वाजता वडाळा स्थानकात दाखल होईल. वडाळा स्थानकातून 1.40 वाजता ही लोकल रवाना करण्यात येणार असून पनवेल स्थानकात 2.40 वाजता ही लोकल दाखल होईल. तर पनवेल स्थानकातून 2.50 वाजता लोकल वाशी करता रवाना होणार असून 3.50 वाजता ही लोकल तेथे दाखल होईल. याकाळात रेल्वेरुळ न ओलांडण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या