आता प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही. मुंबईकरांचा प्रवास स्मार्ट करण्याच्या हेतूने बेस्ट प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. बेस्ट आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळं आता बेस्ट बसची रिअल टाइम माहिती गुगल मॅपवरच पाहता येणार आहे.
आता तुमची बस कुठपर्यंत पोहोचली हे तुम्हाला रिअल टाइमने कळणार आहे. त्यामुळं प्रवाशांच्या वेळेची बचत तर होणारच आहे पण त्याचबरोबर प्रवासही सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन झाले. यावेळी ते म्हणाले की, प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी कोणती बस कधी उपलब्ध असेल याची अचून वेळ सहज उपलब्ध होईल. त्यामुळं प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे.
बेस्ट बसचे रिअल टाइम लोकेशन आणि वेळ समजल्यामुळं प्रवाशांची संख्यादेखील वाढणार आहे. त्यामुळं बेस्टचे उत्पन्न वाढण्यासदेखील मदत होणार आहे. बेस्ट व गुगल मॅप यांच्यामुळं सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तेत सुधार होणार आहे.
प्रवाशांना मोबाईलवरच बस कुठे आहे, किती वेळात येईल, विलंब झाला आहे का? याची माहिती मिळणार आहे. गुगल मॅपवर ही माहिती हिरव्या आणि लाल रंगात दाखवली जाणार आहे. हिरवा रंग वेळेत येणाऱ्या आणि लाल रंग उशीर होणाऱ्या बस दर्शवणार आहे.
सगळ्यात आधी मोबाइलवर गुगल मॅप्स अॅप उघडा. त्यानंतर प्रवासाचे ठिकाण टाकून गो आयकॉनवर क्लिक करा. ट्रामच्या चिन्हावर टॅप करुन पब्लिक ट्रान्सपोर्ट मोड निवडा. त्यानंतर सुचवलेली सेवा निवडून बसचे थांबे आणि रिअल टाइम माहिती तपासा. एखाद्या स्टॉपसाठी सर्च करुनही रिअल-टाइम बसची माहिती पाहता येणार आहे.
हेही वाचा