SHARE

ओला, उबर खासगी या टॅक्सीचालक मालकांनी पुकारलेलं आंदोलन सोमवारी सुद्धा सुरूच राहणार आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. मात्र आंदोलन करूनही कोणताच तोडगा निघाला नसल्यामुळे चालक-मालक आता ओला, उबरच्या कुर्ला आणि अंधेरीतील कार्यालयांवर मोर्चा नेणार आहेत. मात्र गेल्या सात दिवसांपासून संपावर असलेल्या ओला-उबेरच्या समस्यांवर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


अन्य संघटनांचा सहभाग 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात टॅक्सीचालक-मालकांचं सोमवारी देखील आंदोलन सुरू राहणार आहे. ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांच्या या आंदोलनाकडे राज्य सरकार आणि परिवहन विभागाकडून लक्ष दिलं जात नसल्याचा आक्षेप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनात राज्य राष्ट्रीय कामगार संघ, मराठी कामगार सेनेसह अन्य संघटनांचा सहभाग आहे.


'या' मांगण्यांसाठी आंदोलन

ऑनलाइन टॅक्सीचे भाडे किमान १०० ते १५० रु. असावे. प्रति किमीमागे १८ ते २३ रु. भाडे असावे. कंपनीने ताफ्यात नवीन गाड्या बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम देण्यात यावं, या विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालक-मालक गेले सात दिवस आंदोलन करत आहेत.

ओला, उबर चालक-मालकांच्या या सात दिवसांच्या आंदोलनामुळे नियमितपणे या टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. मात्र, हे आंदोलन चिघळत असल्याने या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी आंदोलकांकडून ११ च्या सुमारास उबरच्या कुर्ला आणि ओलाच्या अंधेरीतील कार्यालयांवर चालकांकडून मोर्चा काढला जाणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या