Advertisement

येत्या 14 मेपासून रविवारीही पेट्रोलपंप बंद राहणार


येत्या 14 मेपासून रविवारीही पेट्रोलपंप बंद राहणार
SHARES

शासनमान्य ऑईल कंपन्यांनी अपूर्व चंद्र समितीच्या अहवालाची अंमलबजावणी न केल्याने राज्यासह देशभरातील पेट्रोल पंप चालकांनी बुधवारी पेट्रोल-डिझेलची खरेदी बंद केली. मात्र आता पेट्रोलपंप चालकांनी रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या रविवारपासून वाहनचालकांना इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. पेट्रोलपंप चालकांना दिवसेंदिवस पंप चालविणे कठीण झाले आहे. त्यासाठी अपूर्व चंद्र समितीच्या शिफारशीप्रमाणे प्रलंबित मागण्यांसाठी पेट्रोलपंप चालकांनी पाठपुरावा सुरू केला आहे. पेट्रोल पंपचालकांकडे दोन ते तीन दिवस पुरवठा होईल एवढा साठा असल्यामुळे एक दिवस पेट्रोल खरेदी बंद ठेवल्यानेही काही फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र येत्या 14 मे पासून त्याची तीव्रता जाणवणार आहे. येत्या 14 मेपासून दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्यात येणार आहे आणि 15 मे पासून सकाळी 9 ते 6 यावेळेतच पंप सुरू ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतला आहे. 

2010 पासून पेट्रोलियम मंत्रालयाकडून अपूर्व चंद्रा समितीची नेमणूक झाली. या समितीने पंप चालकांना कमिशन कसे असावे? ऑपरेटिंग खर्च कसा असावा? इतर खर्च कसा असावा? याबाबत अहवाल दिला होता. तो अहवाल शासनाने 2012 ला स्वीकारला. मात्र, त्याची अंमलबजावणी पेट्रोलियम कंपन्यांनी न केल्याने 1 आणि 2 ऑक्टोबर 2012 ला पंप चालकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी ऑईल कंपन्यांनी अत्यल्प मार्जिन वाढविले. सप्टेंबर 2013 ला पेट्रोलियम मंत्रालयाने ऑईल कंपन्यांना समितीचा अहवाल अंमलात आणण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे कंपन्यांनी दुर्लक्ष केले. अद्यापपर्यंत अपूर्व चंद्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने पेट्रोल पंप चालकांच्या खर्चात कपात होऊन नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. राज्यात 4 हजार सातशे पेट्रोल पंप असून, मुंबईत 223 पेट्रोलपंप आहेत. रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवल्यास त्याचा परिणाम रविवारपासूनच जाणवणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोलपंप चालकांनी दिला आहे.

कमिशन वाढवण्याचे सरकारने मान्य केले असून, त्यावर स्वाक्षरी देखील केली आहे. मात्र त्यावर अंमलबजावणी अदयाप करण्यात आलेली नाही. शासनाने ही मागणी मान्य न केल्यास खर्च कमी करण्यासाठी रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.


रवी शिंदे , अध्यक्ष, डीलर्स असोसिएशन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा