मुंबईचा ऐतिहासिक वारसा असणारं 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' म्हणजेच 'सीएसएमटी' या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात वाहतूक संग्रहालय स्थापन होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी 'सीएसएमटी' इमारतीची पाहणी करताना वाहतूक संग्रहालय स्थापन करण्यासंदर्भातील सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
मध्य रेल्वेचे मुख्यालय असणाऱ्या सीएसएमटी इमारतीतील रेल्वेची कार्यालयं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून तिथं फक्त वाहतूक संग्रहालय स्थापन करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस आहे. त्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (आयएनटीएसीएच) संस्थेला यासंदर्भात व्यापक आढावा घेत अहवाल सादर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
या ऐतिहासिक मूल्य असणाऱ्या वास्तूत रेल्वेशी संबंधित आधुनिक मॉडेल्सचा समावेश असू शकतो. त्याचप्रमाणे संभाव्य वास्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांना दृकश्राव्य (ऑडिओ व्हिज्युअल) अनुभव घेता येईल, अशी रचना असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्यालयात वास्तुसंग्रहालयाची उभारणी करण्यासाठी सर्व कार्यालयं शेजारच्या रेल्वे इमारतीत स्थलांतरित करण्याचीही सूचना देण्यात आली आहे.
मे १८७८ साली या वास्तूच्या बांधकामाला सुरूवात झाली. त्यानंतर १८८८ साली हे काम पूर्ण झालं. विल्सन बेल हे या वास्तूचे मुख्य इंजिनिअर होते. १८८७ साली या वास्तूचं नामकरण करुन तिला व्हिक्टोरिया टर्मिनस असं नाव देण्यात आलं. त्यानंतर मार्च १९९६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून या वास्तूला छत्रपती शिवाजी टर्मिनस असं नाव देण्यात आलं. जून २०१७ मध्ये वास्तूचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं ठेवण्यात आलं. सीएसएमटी या वास्तूला २००४ साली युनेस्कोने जागतिक वारसा हक्क प्रदान केला आहे.
हेही वाचा-
सीएसटीत पहिल्यांदाच 'दुहेरी' सरकता जिना
सीएसएमटी-पनवेल, वांद्रे-विरार एलिव्हेटेड रेल्वेला मुहूर्त कधी? वर्ष उलटूनही प्रकल्प कागदावरच
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूषखबर! १ नोव्हेंबरपासून लोकल फेऱ्यांमध्ये वाढ