Advertisement

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी प्रवासी संघटनेचा २६ जानेवारीला आंदोलनाचा इशारा

या सर्वसामान्य प्रवाशांना न्याय मिळावा व लवकरात लवकर लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी रेल्वे प्रवासी संघटना सतत आंदोलन करत आहे.

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी प्रवासी संघटनेचा २६ जानेवारीला आंदोलनाचा इशारा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली लोकल सेवा अद्याप सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंदच आहे. लोकल प्रवास बंद असल्यानं खासगी वाहतुकीनं प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळं दरमहिन्याच्या आर्थिक खर्चात वाढ झाली असून, प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळं या सर्वसामान्य प्रवाशांना न्याय मिळावा व लवकरात लवकर लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी रेल्वे प्रवासी संघटना सतत आंदोलन करत आहे.

अनेकदा रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहारही करण्यात आले आहेत. मात्र, तरीही अद्याप प्रवाशांना त्रासच सहन करावा लागत आहे. त्यामुळं मुंबईची लाईफलाईन सरसकट सर्वांसाठी सुरू झाली नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेकडून २६ जानेवारीला आंदोलन करण्यासाठी कंबर कसली आहे.

मुंबईतील रहदारी, बाजारपेठा, मनोरंजन क्षेत्र सुरू झाली. मात्र मुंबईची लाईफलाईन सरसकट सर्वांसाठी सुरू झाली नाही. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या घोळात सामान्य प्रवासी कात्रीत सापडला आहे. दोन्ही बाजूनं सामान्य प्रवासाची गळाचेपी होत आहे. प्रवासी संघटना वारंवार रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. फोनवर चर्चा करत आहेत. मात्र 'राज्य सरकारच्या परवानगीप्रमाणे लोकल सुरू होईल. लोकल सुरू करण्यासाठी सज्ज आहोत', असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात असल्याची माहिती मिळते.

लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची ठाम भूमिका घेत नसल्याचा आरोप प्रवासी संघटना करत आहेत. त्यामुळं २६ जानेवारीला रेल्वे मुख्यालयात आंदोलन करण्याची भूमिका रेल्वे प्रवासी संघटनांनी घेतली आहे. लोकल सेवा बंद ठेवून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचा संशय आहे.

आधीच आर्थिक गर्तेत पिचलेल्या नागरिकांना खासगीकरणामुळं आणखीन त्रास होईल. त्यामुळं सर्व प्रवासी एकत्र येऊन सरसकट लोकल सुरू करण्याचं म्हणणे आंदोलनाद्वारे रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहे. बुधवारी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक ठेवण्यात आली असल्याचं उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा