Advertisement

अतिक्रमणामुळे रेल्वे प्रकल्पाच्या कामाला लागणार ब्रेक


अतिक्रमणामुळे रेल्वे प्रकल्पाच्या कामाला लागणार ब्रेक
SHARES

रेल्वे रुळालगत झालेले अतिक्रमण आणि हे अतिक्रमण हटविण्यासाठी होणारा विरोध यामुळे रेल्वे प्रकल्पांच्या कामाला ब्रेक लागणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्य सरकारबरोबर केलेल्या चर्चेनंतर मुंबईतील रेल्वेच्या कामाची गती मंदावणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जागेची कमतरता, रेल्वेच्या जागेवर झालेले अतिक्रमण आणि ही अतिक्रमणे हटवण्यासाठी होणारा विरोध यामुळे प्रामुख्याने रेल्वे प्रकल्पांची कालमर्यादा हुकत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सागितले.

बेलापूर-सीवूड-उरण पहिला टप्पा

नवी मुंबईला उरणशी जोडणाऱ्या या मार्गाचे काम डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे छातीठोकपणे सांगितले जात होते. या टप्प्यात वन विभागाची जमीन येत असल्याने त्या तीन किलोमीटरच्या टप्प्यात अद्याप कामे झालेली नाहीत. त्यामुळे बेलापूर ते खारकोपर या स्थानकांदरम्यानचा पहिला टप्पा आधी सुरू करण्यात येणार आहे. आता हा प्रकल्प डिसेंबर 2017 ला पूर्ण होण्याऐवजी त्यातील पहिला टप्पा मार्च 2018 पर्यंत पूर्ण होणार आहे.

बोरीवली-मुंबई सेंट्रल सहावी मार्गिका

एमयुटीपी-2 या योजनेतील बोरीवली-मुंबई सेंट्रल या दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प अनेक वर्ष खोळंबला आहे. आता या प्रकल्पातील बोरीवली ते वांद्रे या दरम्यानचा पहिला टप्पा मार्च 2019 मध्ये आणि वांद्रे ते मुंबई सेंट्रल मार्च 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले. या प्रकल्पादरम्यान अनेक झोपड्या आणि अनधिकृत बांधकामे रेल्वेच्या हद्दीत आहेत. या बांधकामांचे स्थलांतरण आणि लोकांचे पूनर्वसन एमएमआरडीएशी चर्चा करून लवकरच करण्यात येणार आहे. तसेच विलेपार्ले, मालाड आणि बोरीवली येथे खासगी आणि सरकारी जमिनीचा ताबा रेल्वेला घ्यावा लागणार आहे.

हार्बर मार्गाचे विस्तारीकरणही लांबणीवर

अंधेरी ते गोरेगाव या दरम्यान हार्बर मार्गाचे विस्तारीकरण हा प्रकल्पही रखडला असून, राम मंदिर स्थानक तयार झाल्यावर हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल असे सांगितले जात होते. त्यासाठी जून 2017 ची नवीन मर्यादाही आखून दिली होती. आता ही मर्यादा डिसेंबर 2017 एवढी पुढे सरकवण्यात आली आहे.

ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका तीन वर्षे उशिराने

ठाणे-दिवा या दरम्यान सुरू असलेले पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होण्यासाठी अजून 3 वर्षे लागणार असल्याचे मंगळवारच्या बैठकीत रेल्वेतर्फे सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी काही बांधकामे पाडून तेथील लोकांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यासाठी सध्या वेळ लागत असून, आता हा प्रकल्प मार्च 2019 पर्यंत पूर्ण होईल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा