मोर्चेकऱ्यांसाठी रेल्वे प्रशासन सज्ज

  Mumbai
  मोर्चेकऱ्यांसाठी रेल्वे प्रशासन सज्ज
  मुंबई  -  

  मराठा मोर्चासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून दाखल होणाऱ्या मोर्चेकऱ्यांचा नियमित प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून मध्य रेल्वेतर्फे खबरदारी घेतली जात आहे. लोकलच्या वाढीव फेऱ्या, जादा तिकीट खिडक्या, एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे, स्थानकांवर पोलीस बंदोबस्त, असे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


  गर्दीनुसार फेऱ्या

  मोर्चाचे स्वरुप पाहून मध्य आणि हार्बर मार्गावर लोकलच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. दुपारच्या वेळेतही गर्दीनुसार जास्त लोकल फेऱ्या चालविण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.


  एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे

  या मोर्चात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने लांब पल्ल्यांच्या ९ गाड्यांना अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात आले आहेत.

  तिरुनेलवेल्ली-दादर गाडीला मिरज ते दादर, नंदीग्राम एक्स्प्रेसला नागपूर ते सीएसएमटी, महालक्ष्मी एक्स्प्रेसला कोल्हापूर ते सीएसएमटी, मुंबई मेलला सोलापूर ते सीएसएमटी, देवगिरी एक्स्प्रेसला मनमाड ते सीएसएमटी, शालिमार एक्स्प्रेसला अमरावती-बदनेरा ते एलटीटी, सह्याद्री एक्स्प्रेसला कोल्हापूर ते सीएसएमटी, कन्याकुमारी एक्स्प्रेसला सोलापूर-सीएसएमटी, हुसैनसागर एक्स्प्रेसला सोलापूर ते सीएसएमटी या गाड्यांना मुंबईकडे येताना आणि बुधवारी जाताना अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात आले आहेत.


  १२ डब्यांच्या दोन अतिरिक्त गाड्या

  प्रवाशांची संख्या वाढल्यास दोन अतिरिक्त लांब पल्यांच्या गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यामधील एक १२ डब्यांची गाडी सीएसएमटी येथे तयार आहे, तर दुसरी गाडी पुणे येथे आहे. गरज भासल्यास या दोन्ही गाड्या देखील चालवण्यात येतील. यामधील एक गाडी सीएसटी ते कोल्हापूर व्हाया कर्जत-लोणावळा, तर दुसरी गाडी सीएसएमटी व्हाया मनमाड-अहमदनगर ते कोल्हापूरकरीता चालवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी दिली.


  सुरक्षा व्यवस्था

  लाखोंच्या संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी होणार असल्याने रेल्वे सुरक्षा यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे. याकरीता सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली असून महत्वाच्या रेल्वे स्थानकांत आरपीएफची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.

  सीएसएमटी स्थानकात ३०, भायखळा १२, मुलुंड ६, कुर्ला ६, वडाळा ७, बेलापूर ६ आणि वाशी रेल्वे स्थानकात ८ अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय आरपीएफचे अधिकारी देखील विशेष लक्ष ठेऊन राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली.  हे देखील वाचा -

  वाहनचालकांनो मराठा मोर्चाच्या तडाख्यात सापडू नका, या मार्गांचा करा वापर  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.