Advertisement

येत्या काळात मुंबईसह राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार

टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना लवकरच १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे.

येत्या काळात मुंबईसह राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार
SHARES

मुंबईकरांना एखाद्या निश्चित स्थळी लवकर पोहोचायचं असल्यास ते टॅक्सी व रिक्षाला प्राधान्य देतात. रिक्षा-टॅक्सीनं आरामदायी प्रवास प्रवाशांना करता येतो. मात्र, अनेकदा रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मनमानी कारभारामुळं प्रवासी-चालकांमध्ये वाद होतात. त्यातच आता भर म्हणजे रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सींसह रिक्षांच्या नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली आहे. त्याशिवाय, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या आयुर्मानावर १५ वर्षांचे बंधन आणणाऱ्या बहुप्रलंबित खटुआ अहवालाच्या शिफारशी अखेर सरकारनं मान्य केल्या आहेत.

टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना लवकरच १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. एकूण अहवालातील अन्य मान्य शिफारशींनुसार किमान भाड्याच्या दरात वाढ होणार असून, लांब पल्ल्याचा प्रवास स्वस्त होणार आहे. राज्यात काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या सुमारे ७५,०००हून अधिक आहे, तर रिक्षांची संख्या १० लाखांच्या घरात आहे.

सध्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी २० वर्षांची, तर रिक्षांसाठी १५ वर्षांची मर्यादा आहे. टॅक्सींचे आयुर्मान कमी केल्यास अपघातांमध्ये घट होईल. जुन्या गाड्यांमधून होणाऱ्या खडखडाटयुक्त प्रवासापासून प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

निवृत्त आयएएस अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती २०१२मध्ये नेमण्यात आली होती. हकिम पॅनलने दिलेल्या अहवालावर अभ्यास करून अहवाल देण्याच्या सूचना या समितीला सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये खटुआ समितीने अहवाल सादर केला. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर अखेर या अहवालातील बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत.

२०१२च्या हकीम समितीच्या अहवालानुसार, राज्य परिवहन प्राधिकरणानं ऑगस्ट २०१३ मध्ये टॅक्सींचं आयुर्मान कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी २५ वर्षांपर्यंतच्या टॅक्सीवापराला मुभा होती, तर रिक्षांच्या आयुर्मानावर कोणतेही बंधन नव्हते.

रिक्षा-टॅक्सींच्या नवीन भाडेसूत्राच्या शिफारशीला शासनाने मंजुरी दिली आहे. सध्या रिक्षांचे किमान भाडे १८ रुपये, तर टॅक्सींचे किमान भाडे २२ रुपये आहे. शासनाने शिफारस मंजूर केली आहे, मात्र भाडे वाढवण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. शासनाने शिफारशी मंजूर केल्यामुळे भाडेवाढीचा मार्ग सुकर झाला आहे. प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत भाडेवाढ केव्हापासून लागू होईल याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

खटुआ समितीने दिलेला हा अहवाल इंधन दरवाढ, टॅक्सी चालकांचे जीवनमान आणि विम्याची रक्कम या सर्व बाबी लक्षात ठेवून बनवण्यात आला आहे. पॅनलने 'टेलिस्कोपिंग किंमतीबाबतही आपल्या अहवालात सूचना केल्या आहेत. त्यानुसार आठ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास आपण करत असाल तर प्रत्येक किलोमीटर मागचे भाडे कमी करण्यात येईल.

वाढते इंधन दर, वाहन देखभाल खर्च आणि दुरुस्ती खर्च लक्षात घेता दरवर्षी ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या दरात १ जून रोजी सुधारणा करावी, ही शिफारस देखील शासनाने मंजूर केली आहे. यामुळे दरवर्षी १ जूनपासून नवीन भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.हेही वाचा -

मुंबईकरांना लवकरच होणार उन्हाळ्याची जाणीव

मुंबईतील ३८ जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा