Advertisement

रेल्वेवर फुगे माराल, तर गोत्यात याल!


रेल्वेवर फुगे माराल, तर गोत्यात याल!
SHARES

धुळवड खेळताना अतिउत्साहाच्या भरात रेल्वे प्रवाशांवर पाण्याचे फुगे किंवा पिशव्या माराल, तर गोत्यात याल! कारण आरपीएफचे जवान रेल्वे परिसरात गस्त घालतानाच रंग खेळणाऱ्यांवर करडी नजर ठेवणार आहे.

धुळवड साजरी करताना केवळ मौजमजा म्हणून काहीजण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर विशेषत: महिला डब्ब्यावर खराब पाण्याने भरलेले फुगे किंवा पिशव्या मारतात. पण, असं करताना तुम्ही जीआरपीच्या तावडीत सापडाल, तर तुमच्यावर थेट गुन्ह्याची नोंद होऊ शकते. गेल्या वर्षी अशा प्रकारचे एकूण ३२ गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यांच्याकडून ७ हजार १०० एवढा दंड वसूल करण्यात आला.


रेल्वे प्रवाशांवर पाण्याने भरलेले फुगे किंवा पिशव्या मारल्या आणि त्यातून एखाद्याला इजा झाली तर त्या प्रवाशाचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे शक्यतो असं करणं टाळावं. शिवाय, प्रवाशांच्या संरक्षणासाठी जीआरपी, आरपीएफ आणि लोकल पोलीस अशी पथके फुगे मारणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत.
- ए.के. सिंह, मुख्य अधिकारी, आरपीएफ, पश्चिम रेल्वे



कुठे ठेवणार लक्ष?

आरपीएफचे कर्मचारी साध्या वेषात रेल्वे रुळालगतच्या झोपड्यांवर नजर ठेवणार आहेत. माहीम ते वांद्रे, वांद्रे ते खार आणि अंधेरी ते जोगेश्वरी आणि बोरीवली ते विरार या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला लागून सर्वाधिक झोपडपट्ट्या आहेत. या भागातील झोपड्यांमधून अनेकदा रेल्वे प्रवाशांवर घाणीचं पाणी भरून फुगे मारण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या भागांवर आम्ही सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. महिला डब्यांमध्ये फुगे फेकताना कुणी आढळल्यास संबंधितांवर रेल्वेच्या १५४ कलमांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अनुप कुमार शुक्ला यांनी दिली.


झोपडपट्टीत समुपदेशन

अशा घटना टाळण्यासाठी आरपीएफच्या जवानांनी झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन रहिवाशांना मार्गदर्शन केलं आहे. अशा प्रकारचं कृत्य करताना आढळल्यास पोलिसांना वेळेत कळवा, असं आरपीएफने सांगितलं आहे. शिवाय लहान मुलं धुळवड खेळणार असतील तर त्यांनाही रेल्वे प्रवाशांवर फुगे मारू नका, असं पालकांना समजवायला सांगितलं आहे.


'अशी' होणार कारवाई

रेल्वे प्रवाशांवर फुगे किंवा पाण्याच्या पिशव्या फेकताना एखादी व्यक्ती आढळली, तर संबंधित व्यक्तीला २ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. शिवाय, एखाद्या व्यक्तीला मार बसला असेल, तर आरोपीला रेल्वेच्या कायद्यानुसार कारवाई करुन न्यायालयात हजर केलं जाईल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा