Advertisement

मध्य व पश्चिम रेल्वेच्या आरपीएफची मंजूर पदे कमी

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आरपीएफची मंजूर पदे कमी आहेत. त्यामुळं प्रवासी सुरक्षेबाबत धोकाही वाढला आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेच्या आरपीएफची मंजूर पदे कमी
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालली आहे. या गर्दीच्या तुलनेत लोकल फेऱ्याही अपुऱ्या पडत आहेत. परिणामी चोरी व अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळं रेल्वेनं प्रवासी अजूनही असुरक्षित असल्याचं चित्र आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरून दरदिवशी ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर आरपीएफच्या जवानांची नियुक्ती केली जाते. परंतु, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आरपीएफची मंजूर पदे कमी आहेत. त्यामुळं प्रवासी सुरक्षेबाबत धोकाही वाढला आहे.

मंजूर पदे कमी

प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत आरपीएफची मंजूर पदे कमी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला दिली. आरपीएफची १२७२ मंजूर पदे असून सध्या १०८८ जवान आहेत. तर १८४ पदे रिक्त आहेत. मात्र, महिला प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आलेली नाही. अलीकडे या पदांसाठी भरती झाली असून सध्या ते प्रशिक्षण घेत आहेत. ४२६ हवालदारांमध्ये २८३ महिलांचा समावेश आहे. तर ९२ पोलीस उपनिरीक्षकांमध्ये २५ महिलांचा समावेश आहे. प्रशिक्षण घेऊन हे सर्व जण आॅक्टोबर २०२० मध्ये सेवेत रुजू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं न्यायालयाला दिली आहे.

जनहित याचिका दाखल

महिला प्रवासी सुरक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीत उच्च न्यायालयानं मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेनं महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. त्यानुसार, गुरुवारी झालेल्या सुनावणीत मध्य व पश्चिम रेल्वेनं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं.

सीसीटीव्ही कॅमेरे

महिला प्रवासी सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचा दावा मध्य व पश्चिम रेल्वेने केला आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसंच, काही लोकलमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय, प्लॅटफॉर्मवर पुरुष व महिला आरपीएफही तैनात करण्यात आले आहेत, असे रेल्वेने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

अनधिकृत बांधकामं

पश्चिम रेल्वेवरून दररोज १३६७ लोकल तर २०९ मेल धावतात. तरीही रेल्वे हद्दीत भिंत बांधण्यात आलेली नाही. रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. दरदिवशी लोकल ३८ लाख प्रवाशांची वाहतूक करते. लोकलवरील ताण वाढला आहे. धोकाही वाढला आहे. मात्र, त्या तुलनेनं आरपीएफची मंजूर पदे कमी आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेनं न्यायालयाला दिली.

टॉकबॅक यंत्रणा

आरपीएफशिवाय महिला प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्पलाइन नंबर, ट्विटरवरून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनानं न्यायालयाला दिली. तसंच, महिलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम रेल्वेच्या ८ रेकमध्ये टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, आपत्कालीन स्थितीत महिला प्रवासी या यंत्रणेद्वारे मोटारमनशी संपर्क साधू शकतात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

अपघातांचे प्रमाण कमी

मध्य रेल्वेनं ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर यांसारख्या गर्दी असलेल्या स्थानकांवर महिलांना रांगा लावून लोकलमध्ये चढण्याची विनंती केली असल्याचे सांगितले. महिला रांगेने लोकलमध्ये चढत असल्याने अपघात होण्याचे, पर्स, मोबाइल व अन्य वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती मध्य रेल्वेने न्यायालयाला दिली.



हेही वाचा -

राज्यात भयमुक्त वातावरण निर्माण करू, गृहमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

परदेशी नागरिकांना अंमली पदार्थ पुरविल्याप्रकरणी टुरिस्ट गाइडला अटक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा