Advertisement

बेस्ट आर्थिक तोट्यातून बाहेर येणार कधी?


बेस्ट आर्थिक तोट्यातून बाहेर येणार कधी?
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून आपण बेस्ट तोट्यात गेल्याचे ऐकत आहोत. त्यासाठी अनेक प्रयत्नही बेस्ट प्रशासनाकडून केले जात आहेत. पण बेस्ट आर्थिक तोट्यातून बाहेर येताना काही दिसत नाही. त्यामुळे बेस्टसाठी पर्याय सुचवणाऱ्या मुंबईतील ज्येष्ठ वाहतूकतज्ज्ञांनी शनिवारी विशेष बैठक घेतली होती.


काय झाली चर्चा?

बेस्टची ढासळती आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार, मुंबई पालिकेने अर्थसहाय्य पुरवणे, चांगल्या दर्जाच्या बसेस आणि सेवा पुरवणे, कमी अंतरावरील प्रवाशांना आकृष्ट करणे, बेस्ट उपक्रमावरील करांचा बोजा कमी करणे, बससेवेसाठी स्वतंत्र मार्गिका, खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासारखे अनेक उपाय बेस्ट मुख्यालयातील बैठकीत शनिवारी सुचवण्यात आले.

अनेक देशांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम राहण्यासाठी अनेकविध मार्ग अवलंबले जातात. त्यात बसेससाठी स्वतंत्र मार्गिकांचाही समावेश असतो. लंडनमध्येही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या उपायांमुळे तिथली बससेवा उत्तम पद्धतीने चालवली जात असून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे.

अशोक दातार, ज्येष्ठ वाहतूक तज्ज्ञ

केवळ लंडन नव्हे, तर न्यूयॉर्क, सिंगापूर, बोगेटा, सेउल आदी शहरांमध्ये स्वतंत्र बसमार्ग आहेत. अनेक शहरांत नो पार्किंगचेही धोरण राबवले आहे. त्याचप्रमाणे बसमार्गांची संपूर्ण माहिती देणारे फलक थांब्यावर असावेत, बसच्या मागील बाजूलाही मार्ग दाखवले गेल्यास प्रवाशांना बसमार्ग पटकन समजेल, अशीही सूचना दातार यांनी केली.

या बैठकीत बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यासह काही समिती सदस्य सहभागी झाले होते. त्यासह अमिता भिडे, सुधीर बदामी, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर दाते, अजित शेणॉय, सिमप्रीत सिंह, तृप्ती अमृतवार वैतिला, गिरीश श्रीनिवासन यांची उपस्थिती होती. या सर्वांनी एकत्र येत 'बेस्ट बचाव' ही भूमिका मांडणारे निवेदन बेस्टचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापकांना पाठवले होते.


बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्याचा विचार

रेल्वेचे अर्धे प्रवासी बेस्टकडे आल्यास गर्दीचे नियोजन होईल. त्यासाठी बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकेची बीआरटीएस योजना आखायला हवी. मेट्रो आवश्यक असली तरी मेट्रोसाठी येणारा खर्च प्रचंड आहे. बेस्टने 25 रुपये तिकिटांत कुठेही फिरण्यासारख्या योजनांतून महसूल वाढवावा, अशी सूचना केली. अमिता भिडे यांनी महिलांच्या दृष्टीने सुरक्षित प्रवासाचा मुद्दा मांडला. अशोक शेणॉय यांनी मुंबई पालिकेने बेस्टला अर्थसहाय्य करायला हवे, असे मत मांडले. 

विद्याधर दाते यांनी महामार्गांवर 90 टक्के खासगी वाहने दिसतात, अशा वेळी बसेसमुळ जास्त प्रवाशांची वाहतूक साध्य होईल, असे मत मांडले. त्यावर महाव्यवस्थापक बागडे यांनी वाहतूकतज्ज्ञांनी बेस्टसंदर्भात दाखवलेल्या आत्मीयतेबद्दल आभार मानतानाच चर्चेतून आलेल्या अनेक चांगल्या सूचनांचे स्वागत केले. या बैठकीतून आलेल्या मुद्द्यांच्या आधारे मुंबई पालिका आयुक्तांकडे चर्चा केली जाणार असून त्यात वाहतूकतज्ज्ञांनी सहभागी होण्याचे आवाहन कोकीळ यांनी केले.



हेही वाचा - 

ट्रायमॅक्स मशिन्स बंद, छापील तिकिटेही अपुरी, बेस्ट पुढे कशी चालणार?

संधी बेस्टचा इतिहास जाणून घेण्याची, बेस्ट दिनानिमित्त ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा