Advertisement

प्रवाशांना दिलासा, एसटी भाडेवाढ लांबणीवर


प्रवाशांना दिलासा, एसटी भाडेवाढ लांबणीवर
SHARES

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.  गुरुवारी १५ जूनच्या मध्यरात्रीपासून एसटीची १८ टक्के भाडेवाढ लागू होणार होती. मात्र भाडेवाढीच्या प्रस्तावाला एसटी प्राधिकरणाकडून मंजुरीच न मिळाल्यानं ही भाडेवाढ तूर्तास लांबली आहे. 


अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं इंधनवाढ होत असून याचा मोठा फटका एसटीला बसत आहे. ४७० कोटींचा अतिरिक्त भार एसटीवर पडत आहे. त्यातच एसटीनं कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा आर्थिक भार कमी करण्यासाठी एसटीनं १८ टक्के भाडेवाढीचा निर्णय घेत ही भाडेवाढ १५ जूनच्या मध्यरात्रीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या १५ ते १८ जूनदरम्यानच्या सुट्ट्याही एसटी महामंडळानं रद्द केल्या. तसंच सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालयातच हजर राहण्याचे आदेशही दिले होते. 


प्राधिकरणाची मंजुरीच नाही

एसटीच्या निर्णयानुसार गुरूवारी मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात मात्र ही भाडेवाढ लागू झालीच नाही. याचं कारण म्हणजे भाडेवाढीचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला खरा. पण यासंबंधीच्या प्रस्तावाला एसटी प्राधिकरणाची मंजुरीच घेण्यात आली नाही. त्यामुळं गुरुवारची भाडेवाढ तूर्तास लांबल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली आहे. तर येत्या तीन ते चार दिवसांत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी घेऊन एसटीकडून पुढील आठवड्यापासून भाडेवाढ लागू केली जाण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी मुंबई लाइव्हला सांगितलं आहे. 


एसटीच्या कारभारावर नाराजी

१५ जूनच्या मध्यरात्री भाडेवाढ लागू होणार असल्याचं एसटीकडून जाहिर करण्यात अालं असतानाही १५ जूनच्या मध्यरात्रीपर्यंतही एसटीकडून भाडेवाढीचा प्रस्ताव मंजुर झाला नसल्यानं भाडेवाढ लागू होणार नसल्याची कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना वा प्रवाशांना देण्यात आली नव्हती. त्यामुळं एसटीच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा -

संपामुळं एसटीचं १५ कोटींचं नुकसान

रेल्वे प्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्या ; रेल्वेने निर्णय घेतला मागे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा