Advertisement

संपामुळं एसटीचं १५ कोटींचं नुकसान

एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळं मुंबईसह राज्यभरातील एसटी आगारातील २४ हजार ८५२ बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका एसटीला बसला असून दिवसभरात एसटीचं १५ कोटीचं नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

संपामुळं एसटीचं १५ कोटींचं नुकसान
SHARES

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळा (एसटी)कडून कर्मचारी-अधिकाऱ्यांना देण्यात आलेली वेतनवाढ फसवी असल्याचं म्हणत कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं गुरूवारी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन (संप) सुरू केलं आहे. या कामबंद आंदोलनामुळं मुंबईसह राज्यभरातील एसटी आगारातील २४ हजार ८५२ बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका एसटीला बसला असून दिवसभरात एसटीचं १५ कोटीचं नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.


आनंदात विरजन

१ जून रोजी एसटीच्या वर्धापनदिनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देत एसटीनं आनंदाची बातमी दिली. कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असताना गुरूवारी मध्यरात्री अचानक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. त्यानंतर मुंबईसह राज्यभर कर्मचाऱ्यांनी बसगाड्या रोखत, दगडफेक केली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तर दुसरीकडं एसटी प्रशासनानंही कडक भूमिका घेत काही कर्मचाऱ्यांना निलंबित करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.



३० टक्केच सेवा सुरळीत

गुरूवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या कामबंद आंदोलनामुळं आधीच तोट्यात असलेल्या एसटीचं १५ कोटींचं नुकसान झालं आहे. दिवसभरात राज्यातील ३५० आगारातून केवळ ३० टक्केच गाड्या सुटल्या असून केवळ २५ आगारच पूर्ण क्षमतेनं सुरू होती. तर १४५ आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरू होती. तसंच राज्यातील ८० आगारातून दिवसभरात एकही बसफेरी झालेली नाही. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत एसटीच्या ३५ हजार २३९ फेऱ्या होणं अपेक्षित होतं तिथं आंदोलनामुळं केवळ १० हजार ३९७ फेऱ्या झाल्या. तर २४ हजार ८५२ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत.



कुणावर कारवाई करायची?

ही आकडेवारी दुपारी ४ वाजेपर्यंतची असून अजूनही कामबंद आंदोलन सुरू आहे, हे आंदोलन चिघळतच चाललं आहे. त्यातच हे आंदोलन नक्की कोणती संघटना करत आहे हे अधिकृतरित्या समोर येत नसल्यानं कुणाशी चर्चा करायची आणि कुणावर कारवाई करायची असा यक्षप्रश्न एसटी प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

त्यामुळे कामबंद आंदोलन कधी मागे घेतलं जाणार हाही प्रश्न आहे. या धर्तीवर आर्थिक तोट्यात असलेल्या एसटीला या आंदोलनामुळं आणखी मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

Exclusive: वेतनवाढ नकोय तर लिहून द्या! दिवाकर रावते

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा