
महाराष्ट्र राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या ७० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट मिळालं आहे. शुक्रवारी १ जूनला झालेल्या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही वेतनवाढीची खूशखबर एसटी कर्मचाऱ्यांना दिली. एसटी कर्मचाऱ्यांना २२ ते ४८ टक्के वेतन वाढ लागू करण्यात येणार आहे.
२०१२ ते २०१६ या काळात एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांसोबत १२४० कोटींचा करार होता. तर यंदा २०२० पर्यंत ४८४९ कोटींचा करार करण्याचा निर्णय घेत असल्याचं रावतेंनी जाहीर केलं.
केंद्र शासनाचे ७ व्या वेतन आयोगाचं २.५७ सूत्र वापरून ही वेतनवाढ देण्यात येणार आहे. या वेतनवाढीचा लाभ जवळपास ५० हजार एसटी कर्मचाऱ्यांना होणार असून त्याचा अतिरिक्त १७६ कोटींचा आर्थिक बोजा महामंडळ स्वीकारणार आहे.
| प्रमुख भत्ते | विद्यमान दर | सुधारित दर |
|---|---|---|
| हजेरी प्रोत्साहन भत्ता- | ||
| (चालक ४२ दिवसांकरीता) | १८० रूपये | १२०० रूपये |
| धुलाई भत्ता- | ||
| सुती गणवेश | ५० रूपये | १०० रूपये |
| वुलन गणवेश | १८ रुपये | १०० रुपये |
| वुलन जर्सी | १४ रुपये | १०० रुपये |
| रात्रपाळी भत्ता- | ||
| रात्री ९.०० ते सकाळी ६.०० पर्यंत | ||
| (किमान ३ तास) | ११ रूपये | ३५ रूपये |
| रात्री ९.०० ते सकाळी ६.०० पर्यंत |
| (किमान ५ तास) | १३ रूपये | ४५ रूपये |
| रात्रवस्ती भत्ता- | ||
| साधारण ठिकाणी | ४ रूपये | ७५ रूपये |
| जिल्हा ठिकाणी- | ११ रूपये | ८० रूपये |
| विनिर्दिष्टी (मुंबईसारख्या ठिकाणी) | १५ रूपये | १०० रूपये |
कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनवाढीच्या मान्यतेसाठी प्रशासनाने दिलेल्या संमतीपत्रावर ७ जूनपर्यंत सही करायची आहे. तसंच ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांना राजीनामा देऊन कंत्राटी पद्धतीने नोकरी करता येईल. राजीनामा दिलेल्या कंत्राटी चालकाला २० हजार रुपये प्रति महिना आणि कंडक्टरला १९ हजार प्रति महिना पगार मिळेल. ५ वर्षांसाठी हे कंत्राट करण्यात येणार असून दर वर्षाला २०० रूपये वाढ करण्यात येणार आहे.
हेही वाचा-
एसटी प्रवाशांवर ३० टक्के तिकीटदरवाढीचा बोजा?
शिवशाहीच्या तिकीट दरात ज्येष्ठांना सवलत
