Advertisement

पारसिक बोगद्याजवळ महिलांच्या डब्यावर दगडफेक, दोघी जखमी


पारसिक बोगद्याजवळ महिलांच्या डब्यावर दगडफेक, दोघी जखमी
SHARES

चालत्या ट्रेनवर दगड, काचेच्या बाटल्या आणि इतर वस्तू भिरकावण्याचे प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून वाढतच आहे. गेल्या आठवड्यात कळवा-मुंब्य्राच्या दरम्यान पारसिक बोगद्याजवळ काही अज्ञातांनी महिलांच्या डब्यावर बाटल्या आणि काही वस्तू भिरकावल्या. याशिवाय मागील दोन दिवसांत धारदार वस्तू फेकल्याने दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या. यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


हल्ल्यात दोघी जखमी

गेल्या आठवड्यात डोंबिवलीत राहणाऱ्या विद्या कोळी घरी परतत असताना पारसिक बोगद्याजवळ त्यांच्या पायावर एका मुलाने दगड भिरकावला. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात त्यांचा पाय निकामी झाला आहे. अशीच घटना उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत घडली. या सर्व प्रकरणी डोंबिवलीच्या तेजस्विनी महिला संघटनेच्या लता आरगडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

फक्त महिलाच नाही तर एकूणच प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. अनधिकृत झोपडपट्ट्या या लोकांनी बांधून ठेवल्या आहेत. आणि त्या बोगद्याजवळच आहेत. शिवाय, कुठलीही सुऱक्षाव्यवस्था नसल्याकारणाने चालत्या ट्रेनवर कोण आणि कधी? दगड भिरकावेल याचा अंदाजही येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा निघाला पाहीजे.

- लता आरगडे, अध्यक्ष, तेजस्विनी महिला संघटना


रेल्वेप्रवासी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

जर लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर आमच्या प्रवासी संघटना याविरोधात तीव्र आंदोलनं करतील. प्रवाशांचा उद्रेक होईल. त्यामुळे स्थानिक प्रशासन, केंद्रशासन यांनी लक्ष दिलं पाहिजे. शिवाय, याविषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे. निलम गोऱ्हे यांनी देखील याला पाठींबा दिला आहे. त्यामुळे या गंभीर विषयावर तोडगा काढणं गरजेचं आहे.


६ महिने उलटले तरी परिस्थिती तीच

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर महिला संघटनांनी गृहराज्यमंत्री केसरकर यांची बैठक घेतली होती. त्यावेळी या भागातील संरक्षणासाठी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त ठाणे, लोहमार्ग पोलीस आयुक्त, पोलिस महानिरीक्षक सेंट्रल रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा दलास सुरक्षेच्या उपाय योजनांचे आदेश देण्यात आले होते. ही बैठक होऊन ६ महिने उलटले, तरी पारसिक बोगद्याजवळ चालत्या रेल्वेवर होणारे हल्ले कायम असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळे महिला प्रवासीच काय तर एकूणच प्रवाशांना जीव गमवण्याची वेळ येऊन ठेपल्याचा आरोपही आरगडे यांनी केला आहे.



हेही वाचा - 

धावत्या लोकलवर दगडफेक, जखमी महिलेवर वन रुपी क्लिनिकमध्ये उपचार

धावत्या रेल्वेवर दगड मारल्यास थेट जन्मठेप!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा