पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही मोबाईल तिकीट व्हेंडिंग ‘कियोस्क’ मशिन

  Mumbai
  पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही मोबाईल तिकीट व्हेंडिंग ‘कियोस्क’ मशिन
  मुंबई  -  

  उपनगरीय स्थानकांवरील प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २४ मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशिन्स कार्यान्वित केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या ५ स्थानकांवर हे मशिन बसवण्यात आले आहेत.


  काही मिनिटांत मिळवा तिकीट!

  वाढत्या शहरीकरणाच्या विस्तारामुळे उपनगरीय लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. यामुळे स्थानकांवर तिकिटांसाठी लांबच लांब रांगा दिसतात. रांगेतून प्रवाशांची सूटका होण्यासाठी मध्य रेल्वेने २४ मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशिन बसवल्या आहेत. मशिनमध्ये मोबाईल स्कॅन करुन काही मिनिटांत प्रवाशांना तिकीट मिळणार आहे.

  मध्य रेल्वेच्या ५ स्थानकांवर व्हेंडिंग मशिन

  मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावर ४ तर, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांवर प्रत्येकी ५ मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. उपनगरीय लोकल प्रवाशांना लोकल तिकिटांसाठी तिकीट खिडकी, एटीव्हीएम, स्मार्टकार्ड, अधिकृत एजंट यांसह आता मोबाईल तिकिट व्हेंडिंग मशिन्समधून देखील तिकीट घेता येणार आहे.


  मोबाईल स्कॅन करा, तिकीट मिळवा!

  पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांपूर्वी तिकीट व्हेंडिंग कियोक्स मशिन सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता ही सेवा मध्य रेल्वेच्या ५ स्थानकांवर उपलब्ध होणार आहे. युटीएस मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट बुक करणाऱ्यांना तिकिटाचे प्रिंटआऊट हवे असेल, तर मोबाईलवर येणारा आयडी आणि मोबाईल क्रमांक एटीव्हीएमवर टाकणे अनिवार्य होते. ही प्रक्रिया वेळ खाऊ होती. पण, आता तिकीट व्हेंडिंग कियोक्स मशिनवर थेट मोबाईल स्कॅन करुन त्वरीत तिकिटाची प्रत मिळेल.


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.