वसई (vasai) खाडीवर असणाऱ्या नागला बंदर व पश्चिम किनाऱ्यावरील उत्तन डोंगरी येथे भविष्यात रो-रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सागरी मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत.
त्या अंतर्गत या दोन्ही ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. त्याला सीआरझेडसंबंधी मंजुरी प्राप्त झाली आहे.
राज्याच्या किनारपट्ट्या प्रवाशांसाठी समुद्रीमार्गे जोडण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. या धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र सागरी मंडळ करत आहे. त्या अंतर्गत किनारपट्ट्यांवर जेट्टी उभारण्यात येणार आहेत.
उत्तन डोंगरी व नागला बंदर येथे रो-रो सेवेच्या दृष्टीने जेट्टी उभारण्यास किनारपट्टी नियमन क्षेत्रासंबंधी महत्त्वाची मंजुरी मिळाली आहे.
या अंतर्गत नागला बंदर व उत्तन या दोन्ही ठिकाणी 143 मीटर लांब व 10 मीटर रुंदीच्या जेट्टी उभारल्या जाणार आहेत.
या जेट्टी (jetty) सर्वाधिक लांबीच्या असून रो-रोसारखे (Ro-Ro) मोठे जहाज तेथे उभे राहू शकेल. त्याच वेळी या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून जलप्रवासाच्या दृष्टीने मोठे केंद्र उभारले जाणार आहे.
यासाठीच जेट्टींशिवाय वाहनतळ, बोटीत चढण्यासाठीचा मार्ग, संरक्षक भिंत यांचेही बांधकाम होणार आहे. त्यामध्ये नागला बंदर येथे 2,025 चौरस मीटर, तर उत्तन डोंगरी येथे 7,200 चौरस मीटर क्षेत्रफळाचा वाहनतळ, नागला बंदर येथे 45.42 मीटर उंचीची, तर उत्तन डोंगरी येथे 60 मीटर उंचीची संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.
या सर्व बांधकामाला महाराष्ट्र (maharashtra) किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) सीआरझेडसोबत कांदळवनांसंबंधीच्या उपाययोजना करण्यासह मंजुरी दिली आहे. तसेच अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या संबंधित प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
हेही वाचा