Advertisement

प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेची 'ही' नवी सुविधा

रेल्वे स्थानकातील मोकळ्या जागेचा वापर प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी करण्याकरिता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेची 'ही' नवी सुविधा
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनानं अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशातच आता पश्चिम रेल्वेनं प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकात सलून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रलसह ६ रेल्वे स्थानकात वातानुकूलित सलून सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

महिला आणि पुरुष दोघांनाही या सुविधेचा वापर करता येणार आहे. रेल्वे स्थानकातील मोकळ्या जागेचा वापर प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी करण्याकरिता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकातील प्रवासी वर्दळीला अडचण ठरणार नाही, अशा ठिकाणी हे सलून उभारण्यात येणार आहेत.

अंधेरी रेल्वे स्थानकात २ आणि मुंबई सेंट्रल, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि सुरत या रेल्वे स्थानकांत प्रत्येकी १ अशी सलून उभारण्यात येणार आहेत. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सलूनचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. शुल्क भरण्यासाठी डिजिटल पर्यायही प्रवाशांना इथं उपलब्ध होणार आहे.

वातानुकूलित सलूनमध्ये डोक्याची मालिश, चेहऱ्याची मालिश यांसह सामान्य केशकर्तनालयातील सर्व सुविधा प्रवाशांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सलूनसाठी निवडक रेल्वे स्थानकांतील प्रत्येकी २५६ चौरस फूट इतकी जागा भाडेतत्त्वाने देण्यात येणार आहे. ५ वर्षांसाठी हा करार असणार आहे. या जागेचा देखभाल खर्च हा संबंधितालाच करणे बंधनकारक राहणार आहे.

कंत्राटदाराने नियमांचे उल्लंघन केल्यास किंबहूना प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास कंत्राटदारांला १० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातील प्रत्येक सलूनमध्ये तक्रारवही असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेरील ६ स्थानकांवरील एकूण ७ ठिकाणी वातानुकूलित सलून उभारण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) मागवण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा