पश्चिम रेल्वेच्या (western railway) अंधेरी ते विरार (andheri to virar) या मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. गेली अनेक वर्षे प्रवाशांना धक्काबुक्कीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळं या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी धीम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला. त्यानुसार सोमवार २८ जूनपासून १५ डब्यांच्या नवीन फेऱ्या या मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेच्या नियोजनानुसार, १८ फेऱ्या धीम्या मार्गावर आहेत. शिवाय याच पट्ट्यात १५ डब्यांच्या जलद लोकलच्याही फेऱ्या वाढवण्यात आल्या असून त्याच्या ७ फेऱ्या होणार आहेत. १५ डब्यांच्या धीम्या लोकल चालवण्यासाठी पश्चिम रेल्वेनं अंधेरी ते विरार दरम्यान ३ वर्षांपूर्वी प्रकल्प हाती घेतला. या मार्गावर १५ डबा धीम्या लोकल चालवण्यासाठी व जलद मार्गावरीलही लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी जोमाने काम सुरु होते.
जानेवारी २०२१ आणि त्यानंतर मार्च २०२१ पासून या मार्गावर वाढीव डबा लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजनही करण्यात आले होते. परंतु ६० कोटी रुपये किंमत असलेल्या प्रकल्पाचे काम बऱ्याच तांत्रिक अडचणी व गेल्या वर्षांपासून करोनामुळे थांबले होते. अखेर एप्रिल २०२१ मध्ये याची सर्व कामे पूर्ण झाली. मात्र निर्बंध व कमी असलेली प्रवासी संख्या यामुळे अंधेरी ते विरार दरम्यान पंधरा डबा धीम्या लोकल सुरु करणे योग्य ठरेल का याचा विचार प्रशासन करत होते. अखेर त्याला मुहूर्त मिळाला व सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
अंधेरी ते विरार मार्गावरील गर्दी पाहता सोमवारपासून या मार्गावर २५ नवीन लोकल फेऱ्यांची भर पडेल. यात १८ धीम्या लोकल फेऱ्या आणि ७ जलद लोकल फेऱ्या धावतील. त्यामुळे २५ टक्के प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे. १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांत रूपांतरीत केल्या जातील. अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरार स्थानकांत गर्दी वाढतच आहे. अंधेरी ते विरार दरम्यान पंधरा डबा धीमा लोकल प्रकल्प झाल्याने या मार्गाबरोबरच चर्चगेट ते विरार, डहाणू दरम्यानच्याही पंधरा डबा लोकल फेऱ्या वाढतील. सध्या २५ नवीन लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे.
वेळापत्रक
१५ डब्यांची पहिली धीमी लोकल भाईंदरमधून सकाळी ४.४५ वाजता सुटेल व विरारला सकाळी ६.११ वाजता पोहोचेल. त्यानंतर बोरीवलीतून विरारसाठी सकाळी ७.०२ वाजता, अंधेरीतून नालासोपारासाठी सकाळी ९.२९ वाजता धीमी लोकल सुटणार आहे. विरारहून धीमी लोकल सकाळी ६.२१ वाजता बोरीवलीसाठी सुटेल.
हेही वाचा -
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ, 'ही' आहे शवटची तारीख
रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री