Advertisement

बेस्ट कर्मचारी साजरी करणार गोड संक्रांत, लाडू, फटाके आणि जल्लोष


बेस्ट कर्मचारी साजरी करणार गोड संक्रांत, लाडू, फटाके आणि जल्लोष
SHARES

बेस्ट आणि बेस्ट कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्याची लढाई सुरू होती. आपल्या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. या संपाचा फटका मुंबईकर प्रवाशांना बसला खरा, पण त्याचवेळी या संपानं बेस्ट कर्मचाऱ्यांचं, त्यांच्या कुटुंबाचं जगणं, त्यांच्या हालअपेष्टाही मुंबईकरांसमोर आणल्या आणि त्यामुळेच सर्वसामान्य मुंबईकरांनी हाल सहन करतानाच बेस्ट कर्मचार्यांच्या पाठिशीही उभा ठाकला.


तर १५ जानेवारीला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी कडू मकर संक्रांत साजरी करत बेस्ट प्रशासन आणि मुंबई महानगर पालिकेविरोधातील संताप व्यक्त केला. मंगळवारी ज्या कुटुंबियांनी मकर संक्रांतीच्या गोड दिवशी कडू मकर संक्रांत साजरी केल्या त्याच कुटुंबियांकडून आता गोड मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. कारण बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नऊ दिवसांच्या लढाईला अखेर यश आलं आहे. बेस्ट कर्मचार्यांच्या पगारात लवकरच वाढ होणार असून त्यांच्या इतर मागण्यांचाही आता विचार होणार आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला असून सध्या वडाळा डेपोसह मुंबईतील सर्वच डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचा जल्लोष सुरू आहे. फटाके फोड, नाचत कर्मचारी जल्लोष साजरा करत आहेत. तर घरोघरी आता तिळगुळ वाटला जाणार असून लाडूही बनवले जाणार आहेत.


मेस्मालाही नाही घाबरले

संपाचा इशारा दिल्यानंतर आणि प्रत्यक्षात संपावर गेल्यानंतर बेस्ट प्रशासन असो कि महानगर पालिका यांच्याकडून केवळ चर्चेचं गुर्हाळ गाळलं गेलं. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पदरी काहीच न पडलं नाही. बेस्ट संप मागे घ्यावा यासाठी बेस्ट प्रशासनानं मेस्माअंतर्गत कारवाई करत कर्मचाऱ्यांवर दबावही आणण्याचा प्रयत्न केला. काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. काहींना निवासस्थानं रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्या. या कडक कारवाईनंतरही कर्मचारी डगमगला नाही, त्यांनी एकी दाखवत, एकमत राखत संप सुरूच ठेवला.
नऊ दिवसांच्या लढ्याला यश

अखेर या संपाला न्यायालयीन लढाईत यश आलं. कर्मचाऱ्यांनी आपली न्याय हक्काची लढाई जिंकली. आता लवकरच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान ७ हजार रुपयांची वाढ होणार आहे तर इतरही मागण्या लवकरच निकाली निघणार आहेत. एकीकडे बेस्टच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा संप, तर दुसरीकडे या सर्वात मोठ्या संपाला मिळालेलं हे मोठं यश, या दोन्ही गोष्टींमुळे हा संप मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणार आहे. तर हा संप यशस्वी झाल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांचा आनंद काही गगनात मावेनासा झाला आहे. वडाळा डेपोसह सर्वच डेपोमध्ये, बेस्ट वसाहतीमध्ये सध्या आनंदाचं, उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे.
आता गोड मकर संक्रांत

बेस्ट कर्मचारी कष्ट करतो, मुंबईकरांची सेवा करतो, पण त्याला पगार मिळतो तो तुटपुंजा. त्यातही हा पगार वेळेत मिळत नाही. त्यामुळे या पगारात आम्ही कसं घर चालवतो ते आम्हालाच माहित. आमच्या मुलाबाळांचं शिक्षण आम्हाला या पगारात करता येत नाही असं सांगत बेस्ट कर्मचाऱ्याची पत्नी सोनाली सातर्डेकर यांनी आज आम्ही सण साजरा करणार असल्याचं मंबई लाइव्हला सांगितलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी कडू निंबाची पानं वाटत बेस्ट कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कडू मकर संक्रांत साजरी केली होती. आज मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या घरात गोडाधोडाचे पदार्थ बनणार असल्याचंही सातर्डेकर यांनी सांगितलं आहे.हेही वाचा -

तब्बल नऊ दिवसांनंतर मुंबईच्या रस्त्यावर धावल्या बेस्ट बस, संप मिटला

नवव्या दिवशी अखेर तिढा सुटला, संप मागे, लवकरच अधिकृत घोषणासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा