Advertisement

तब्बल नऊ दिवसांनंतर मुंबईच्या रस्त्यावर धावल्या बेस्ट बस, संप मिटला

संपाची घोषणा झाल्याबरोबर कर्मचारी कामावर रुजू झाली असून बेस्ट वाहकांनी बेस्ट बसचं स्टेअरिंग हातात घेतलं आहे. तब्बल नऊ दिवसांनंतर आता मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बस दिसू लागल्या आहेत.

तब्बल नऊ दिवसांनंतर मुंबईच्या रस्त्यावर धावल्या बेस्ट बस, संप मिटला
SHARES

विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेला संप अखेर नवव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा बेस्ट कृती समितीचे निमंत्रक शशांक राव यांनी दुपारी वडाळ्यातील कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात केली. संपाची घोषणा झाल्याबरोबर कर्मचारी कामावर रुजू झाली असून बेस्ट वाहकांनी बेस्ट बसचं स्टेअरिंग हातात घेतलं आहे. तब्बल नऊ दिवसांनंतर आता मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बस दिसू लागल्या आहेत. त्यामुळे २५ लाख बेस्ट प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कित्येक संप केले, आंदोलनं केली. पण सर्वाधिक काळ, तब्बल नऊ दिवस सुरू राहिलेला असा हा एकमेव मोठा एेतिहासिक संप होता. या संपानं बेस्ट कर्मचाऱ्यांची ताकद बेस्ट प्रशासनाला, मुंबई महानगर पालिकेला, सरकारला दाखवून दिली तर दुसरीकडे आपल्या न्याय हक्काचा लढाही यशस्वी केला.




या मागण्यांसाठी संपाची हाक

आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बेस्ट अर्थसंकल्पाचं मुंबई महानगर पालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीनीकरण करावं, २००७ साली भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची मास्टर ग्रेडमध्ये वेतन निश्चिती करावी आणि कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू करावी या मुख्य मागण्यांसाठी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ३० हजारांहून अधिक कर्मचारी बेमुदत संपावर गेले. रेल्वेनंतर बेस्ट ही मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. बेस्टने दररोज २५ लाख प्रवाशी प्रवास करतात. अशावेळी बेस्ट बंद झाल्यानं सर्वसामान्य प्रवाशांचे ८ जानेवारीपासून हाल सुरू झाले. रिक्षा-टॅक्सीचा पर्याय त्यांना घ्यावा लागला नि त्यांच्या खिशालाही बरीच चाट बसू लागली. प्रवाशी बेहाल होऊ लागले.



बैठका-चर्चा निष्फळ

याआधीचे बेस्टचे संप लक्षात घेता संप जास्तीत जास्त दोन दिवसांत संपेल असं वाटतं होतं. पण बेस्टचा संप सुरूच राहिला. बेस्ट प्रशासन, महानगपालिकेशी चर्चा बैठका निष्फळ ठरल्या. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेऊनही संपावर तोडगा निघाला नाही. त्यातच बेस्ट संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर, याचिकेवर सुनावणीवर सुनावणी झाल्यानंतरही संप काही मिटता मिटत नव्हता. त्यामुळे मुंबईकरांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला होता.


न्यायालयात तोडगा

अखेर नवव्या दिवशी, बुधवारी सकाळी उच्च न्यायालयानं संपावर तोडगा काढण्यात यश मिळवलं. बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये मध्यस्थीसाठी मध्यस्थ नेमत तीन महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर संपकऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं न्यायालयात दिली. त्यानंतर बेस्ट कृती समितीनं बेस्ट संप मागे घेण्याची ग्वाही देत संप मागे घेण्याचा निर्णय जाहिर केला. न्यायालयाच्या निकालानंतर वडाळा बेस्ट डेपो इथं कर्मचाऱ्यांनी मोठी सभा आयोजित केली.


किमान ७ हजार रुपयांची पगारवाढ

या सभेत शशांक राव यांचं कर्मचाऱ्यांनी जोरदार स्वागत केलं. तर शशांक राव यांनी मुंबईकरांना सलाम करत मुंबईकरांसह कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचेच जाहिर आभार मानले. तर कर्मचाऱ्यांना हात जोडून अभिवादन केलं. बेस्ट आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना संपवण्याचा घाटच पालिका, बेस्टने घातला होत असा आरोप करतानाच शशांक राव यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. तर त्रिसदस्यी कृती समितीचा अहवाल हा कर्मचाऱ्यांसाठी मृत्यूपत्र होतं आणि या मृत्यूपत्रावर सह्या न करता कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून आपले न्याय हक्क मिळवून घेतले, आपला लढा यशस्वी झाला असं म्हणत न्यायालयासह कर्मचाऱ्यांचे जाहीर आभार मानले. तर आता या लढ्यामुळं बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात महिन्याभरात किमान ७ हजार रुपयांची वाढ होईल असं शशांक राव यांनी जाहीर करताच वडाळा डेपोत एकच जल्लोष झाला. कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.



४५३ क्रमांकाची पहिली बस धावली

शेवटी शशांक राव यांनी संप मिटल्याची घोषणा केली. त्यानंतर बेस्ट कर्मचारी कामावर रूजू झाले आणि तब्बल नऊ दिवसानंतर मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बस धावू लागल्या. दरम्यान, ज्या वडाळा डेपोतून संप मिटल्याची घोषणा झाली ज्या डेपोत कर्मचाऱ्याने जल्लोष साजरा केला त्याच डेपोतून ४५३ क्रमांकाची पहिली बस धावली. त्यानंतर १७४ आणि ११० क्रमांकाची बस धावली. आणि अखेर कर्मचारी आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.




हेही वाचा -

प्रियांका-सलमान ठरले 'बॉलीवूड ट्रेंडसेटर'!

बेस्टचा संप संपता संपेना! सलग नवव्या दिवशीही मुंबईकर वेठीस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा