Advertisement

वडाळा पुलावर झोपडपट्टीधारकांची चिंधीगिरी


वडाळा पुलावर झोपडपट्टीधारकांची चिंधीगिरी
SHARES

वडाळा पुलावरील पदपथावर झोपडपट्टी धारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पदपथावरील जागा तोकडी पडू लागली आहे. त्यात आता चिंधी विक्रेत्यांनी देखील उर्वरित पदपथावर आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांना चालण्यासाठी जागाच उरली नाही. तर रस्त्याच्या कडेला देखील अनधिकृतरित्या उभ्या राहणाऱ्या टेम्पोचा वावर वाढलाय. इतकी गंभीर बाब असूनदेखील पालिका या चिंधी विक्रेत्यांवर अथवा अनधिकृत अतिक्रमणावर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे येथील पादचाऱ्यांचे म्हणणे आहे.

वडाळा पुलावरील पदपथावर गेल्या कित्येक वर्षांपासून झोपडीधारकांनी हात पाय पसरले आहेत. पूर्वी झोपड्या ठराविक होत्या, परंतु पालिकेचे येथे नियंत्रण नसल्यामुळे कालांतराने झोपड्या वाढल्या असून थेट पुलावरील बस स्थानकापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यात आता चिंधी विक्रेतेही या पदपथावर बस्तान मांडू लागले आहेत. परिसरातून जमा करून आणलेल्या कपड्यांच्या चिंध्या पदपथावर पसरून ठेवतात. विशेष म्हणजे पदपथावर वाढत चाललेल्या अनधिकृत बस्तानांमुळे वडाळा पुलावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना बस स्थानकावरदेखील श्वास कोंडून उभे रहावे लागते. या गंभीर समस्यांची दखल घेऊन पालिका एफ उत्तर विभागाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील पादचाऱ्यांमध्ये जोर धरू लागली आहे.

"अनधिकृतरित्या वाढत चाललेल्या झोपड्यांवर तसेच चिंधी विक्रेत्यांवर पालिकेने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तर नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत," अशी मागणी विशेष कार्यकारी अधिकारी संजय जोशी यांनी केली आहे.

"पदपथावरील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर पदपथावरील चिंधीवाले आणि अनधिकृतरित्या उभ्या राहणाऱ्या चिंधीच्या वाहनांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात तसेच वाहतूक विभागास पत्रव्यवहार करण्यात आला आहे," असे एफ उत्तर विभागाचे सहायक अभियंता केशव उबाळे यांनी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा