ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचं मंगळवारी निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या १५ दिवसांपासून मुर्डेश्वर आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मागील आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यातील ‘कौशल्य’ रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारपर्यंत ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातंवडे असा परिवार आहे.
लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी १९४६ मध्ये तेव्हाच्या ठाणे मामलेदार कचेरीबाहेरची जागा व्यवसायासाठी शासनाकडून भाडेतत्वावर घेतली होती. तिथं त्यांनी कँटीन सुरू केलं आणि अवघ्या सहा वर्षांनी म्हणजेच १९५२ मध्ये नरसिंह मुर्डेश्वर यांचं निधन झालं.
त्यानंतर कँटीनची सारी जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर पडली. कँटीनमध्ये अन्य पदार्ध मिळत असले तरी मिसळ ही या कँटीनची ओळख होती. खवय्यांना त्यांच्या मागणीनुसार कमी वा जास्त तिखट मिसळ मिळू लागली आणि बघता बघता या मिसळची चव सर्वत्र पसरली. त्यातूनच या कँटीनला 'मामलेदार मिसळ' असं नावही पडलं.
मामलेदार मिसळचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक ठिकाणांहून खास मिसळ खाण्यासाठी लोक ठाण्यात येतात. ठाण्यात गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशी दोन नाट्यगृहे आहेत. शिवाय अनेक मालिकांचे चित्रिकरणही ठाण्यात होते. त्यामुळे येथे कलावतांची येथे ये-जा मोठ्या प्रमाणात असते. साहजिकच ठाण्यात आल्यावर अनेक सेलिब्रिटींचे पाय आपसूक मामलेदार मिसळकडे वळतात.
हेही वाचा