बटरपासून साकारले सावरकरांचे शिल्प!

Dadar
बटरपासून साकारले सावरकरांचे शिल्प!
बटरपासून साकारले सावरकरांचे शिल्प!
बटरपासून साकारले सावरकरांचे शिल्प!
बटरपासून साकारले सावरकरांचे शिल्प!
See all
मुंबई  -  

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 134 व्या जयंतीनिमित्त दादरच्या सावरकर स्मारकात सावरकरांचे तब्बल 3.6 फूट उंचीचे शिल्प बटरपासून साकारण्यात आले आहे. या शिल्पासाठी 3 कलाकारांनी (शेफ) 21 मे पासून 28 मे पर्यंत बटरपासून हे शिल्प घडवले आहे.

भारतामध्ये अनेक शिल्प यापूर्वी बनविण्यात आली आहेत. परंतु एका क्रांतिकारी व्यक्तीचे बटरपासून शिल्प बनविण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. परकीय देशांमध्ये एखादे शिल्प बनवले आणि ते एखाद्या प्रदर्शनात मांडल्यानंतर त्या खाद्यपदार्थांचा वापर केला जातो. परंतु या शिल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे बटरपासून घडविण्यात आलेले शिल्प दीड वर्ष स्मारकात येणाऱ्या लोकांना बघण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या 3.6 फूट उंचीच्या शिल्पासाठी तब्बल 75 किलो बटर वापरण्यात आले आहे. हे शिल्प बनविण्यासाठी शेफ जितेंद्र काळे, शेफ रोहन सुरेंद्र खंडागळे आणि शेफ भूषण विजय चिखलकर यांनी मेहनत घेतली आहे.

अनेकदा अशी शिल्प दिवाळी, ख्रिसमस किंवा एखाद्या सणाचे औचित्य साधून 2D स्वरूपात तयार केली जातात. परंतु एखाद्या क्रांतिकारी व्यक्तीच्या जयंतीला थ्रीडी शिल्प बटरपासून बनविण्याची देशातली पहिलीच वेळ आहे. शेफचा बटरशी दररोजचा संबंध येतो. एक वेगळी कलाकृती निर्माण करण्यासाठी या शेफनी घेतलेली मेहनत लक्षात घेऊन हे शिल्प जास्तीत जास्त दिवस कसे टिकवून ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती स्मारकाचे सदस्य शैलेंद्र चिखलकर यांनी दिली.


आजपर्यंत कोणत्याही क्रांतिकारी व्यक्तीचे बटरपासून शिल्प बनविण्यात आले नव्हते. म्हणून हे शिल्प बनविण्यात मला विशेष रस होता. हे शिल्प बनविताना स्मारकाने आम्हाला आवश्यक ती सर्व मदत केली. या शिल्पाचे पूर्ण काम 70 डिग्री सेल्सिअस वातावरणात करण्यात आले आहे. मी या शिल्पासाठी रणजित सावरकर यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव ठेवताच त्यांनी तो मान्य देखील केला. तसेच माझ्या सहकाऱ्यांनी मला मदत केली. त्यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे. माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब म्हणजे हे शिल्प स्मारकात येणाऱ्या लोकांना पाहण्यासाठी काही दिवस जतन केले जाणार आहे.
शेफ भूषण चिखलकर, ट्रॅव्हल फूड सर्व्हिस, डोमेस्टिक एअरपोर्ट, मुंबई

रोज पेस्ट्रीमध्ये माझ्याकडून वापरले जाणारे बटर एक दिवस एखाद्या क्रांतिकारी व्यक्तीच्या शिल्पासाठी मी वापरेन, असे मला कधीच वाटले नव्हते. माझा अनुभव खूप छान होता. हे वेगळे काम करताना मला खूप मजा आली. आम्ही तिघे मिळून ही कलाकृती उत्तम सुंदर रेखीव बनवू शकलो याचा आनंद आहे. बटरपासून अनेक गोष्टी आजपर्यंत बनविल्या आहेत. पण बटरपासून मी बनविलेले हे शिल्प माझ्या कार्यकाळातील अविस्मरणीय शिल्प आहे.
शेफ रोहन खंडागळे, पुणे

आपण रोज जे काम करतो त्यात काहीतरी वेगळेपण असावे. आपण केलेले काम कुणीतरी आवर्जून पहावे ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. तशीच माझी देखील इच्छा होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रत्येक भारतीयांच्या मनात एक वेगळे आदराचे स्थान आहे. तसेच ते माझ्याही मनात आहे. सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून मला त्यांचे शिल्प घडविण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे.
शेफ जितेंद्र काळे, असिस्टंट प्रोफेसर, आयपीएस अकादमी, आयओएचएम, इंदौर

प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती आपले वेगळेपण दाखविण्यासाठी इच्छुक असतो. गरज असते ती त्या व्यक्तीला एक व्यासपीठ मिळवून देण्याची. सावरकरांच्या जयंती निमित्त बटरच्या साडेतीन फुटांपेक्षा अधिक उंचीचा पुतळा बनविण्याचा प्रस्ताव शेफनी ठेवल्यामुळे सावरकरांचा बटरचा पुतळा बनविण्यासाठी आम्ही स्मारकाच्या वतीने मान्यता दिली. यामध्ये कौतुकाची बाब म्हणजे कमी वेळात या शेफनी हे शिल्प साकारले आहे. याचा विशेष आनंद होत आहे.
राजेंद्र वराडकर, कार्यवाहक, स्वा. सावरकर स्मारक, दादर

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.