Advertisement

फोटोग्राफी ही केवळ कला नसून ध्यास आहे - प्रदीप बांदेकर


फोटोग्राफी ही केवळ कला नसून ध्यास आहे - प्रदीप बांदेकर
SHARES

फोटोग्राफी ही केवळ कला नसून, ध्यास आहे. तो छंद म्हणून जोपासला तर कोणताही तोटा छायाचित्रकाराला होणार नाही. आज जगात डिजीटल क्रांती जरी झाली असली तरी जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत छायाचित्रकाराला मरण नाही असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार प्रदीप बांदेकर यांनी व्यक्त केला. नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट अर्थात एनयुजे महाराष्ट्र आणि एनयुजे इंडिया यांच्या वतीने शनिवारी दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात छायाचित्र राष्ट्रीय स्पर्धा आणि प्रदर्शन व छायाचित्र पत्रकारिता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, युनियनचे अध्यक्ष डॉ. उदय जोशी, महासचिव शितल करदेकर, बाबा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात निवडक छायाचित्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

छायाचित्र ही एक उत्तम कला आहे. मात्र छायाचित्रकाराने ती कला अस्तित्वात उतरवताना चांगला दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे. कोणतेही छायाचित्र बोलके असले की, त्यावर लिहिण्याची आवश्यकता नसते. कारण ते छायाचित्र स्वतःच आपली ओळख पटवून देत असते. अशीच छायाचित्र संकलित करून त्यांना आणि त्यांचे महत्व जाणून टिपणाऱ्या छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात मांडण्यात आलेली छायाचित्र एप्रिल ते मे 2017 दरम्यान मागविण्यात आली होती. त्यातून निवडण्यात आलेल्या छायाचित्रांचे एकदिवसीय प्रदर्शन शनिवारी दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात भरविण्यात आले होते.

यामध्ये डीएनएचे छायाचित्रकार अभिनव कोचरेकर यांच्या छायाचित्राला प्रथम क्रमांक, सकाळ टाइम्सचे छायाचित्रकार प्रशांत सावंत यांना व्दितीय क्रमांक आणि निर्भय पथिकचे छायाचित्रकार मिहीर हांडेपाटील यांनी तृतीय क्रमांक मिळाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा