Advertisement

मराठी भाषा कागदावर नव्हेतर मनात असावी- प्रशांत दामले


मराठी भाषा कागदावर नव्हेतर मनात असावी- प्रशांत दामले
SHARES

मराठी भाषा पुढे टिकून ठेवण्यासाठी आपल्या मुलांना या भाषेचं शिक्षण देणं आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक पालकाने मेहनत घ्यायला हवी. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी स्वत:च्या घरापासून प्रयत्न करायला हवं, असे स्पष्ट करत प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी मराठी भाषा ही कागदावर नाही तर मनात असायला हवी, असे उद्गार मराठी भाषा गौरवदिनी बोलताना काढले.


पुढे काय म्हणाले प्रशांत दामले?

महानगरपालिकेतर्फे ‘मराठी भाषा गौरव दिन आणि पंधरवडा - २०१८’ चा शुभारंभ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापालिका सभागृहात पार पडला. यावेळी अभिनेते प्रशांत दामले हे प्रमुख वक्ते होते. मराठी भाषा दिनानिमित्त प्रशांत दामले यांना महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘वैभव मराठीचे, विश्व नाट्यसृष्टीचे’ या विषयावर बोलतांना प्रशांत दामले यांनी माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकली मोठी झाली. त्यानंतर उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी इंग्रजीतून शिक्षण घेतले. त्यामुळे आज त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत आहे. यावेळी त्यांनी आपल्या सुरुवातीला इंग्रजी भाषा येत नसल्याचेही सांगितले. परंतु ही भाषा येत नाही म्हणून वाईट वाटण्यासारखंही नाही, असंही त्यांनी सांगितले.

मराठी नाट्यगृहे ही चांगल्या दर्जाची बनवली जावीत, अशीही सूचना त्यांनी यावेळी महापालिकेला केली. आज कुणीही मराठी भाषेतील पुस्तके वाचत नाहीत. वर्तमान पत्रे वाचत नाहीत. त्यामुळे मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे. पण यासाठी कोणत्याही मराठी कथा, कादंबऱ्या या वाचल्या गेल्या पाहिजे.


'संकल्पाची अंमलबजावणी व्हावी'

मराठी भाषा संवर्धनासाठी अनेक जण संकल्प करतात. पण या संकल्पाची अंमलबजावणी ही आपल्याकडून प्रभावीपणे होत नाही. मराठीचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी केलेल्या संकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं.


नगरसेवकांची उपस्थिती कमी

नगरसेवकांच्या शिफारशीनुसार हा मराठी गौरव दिन तसंच पंधरवडा साजरा केला जात असला तरी प्रत्यक्षात या शुभारंभाच्या कार्यक्रमाला नगरेसवकांनीच पाठ फिरवली होती. या कार्यक्रमाला उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृहनेते यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, भाजपाचे गटनेते मनोज कोटक, सुधार समितीचे अध्यक्ष बाळा नर, विधी समितीचे अध्यक्ष सुहास वाडकर, स्थापत्य समिती अध्यक्ष तुळशीराम शिंदे यांच्यासह माजी महापौर श्रद्ध जाधव, सुजाता सानप, दिलीप लांडे, कमलेश यादव, बाळा तावडे, जोत्स्ना मेहता, रमाकांत रहाटे, अरविंद भोसले, वायंगणकर, दत्ता पोंगडे, आकाश पुरोहित, जावेद जुनेजा, सान्वी तांडेल, सिंधु मसुरकर, साधना माने, ऍड खरात, दत्ताराम नरवणकर एवढेच नगरसेवक उपस्थित होते. तर प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक, जनसंपर्क अधिकारी विजय खबाले-पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा