Advertisement

नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही - राज ठाकरे


नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही - राज ठाकरे
SHARES

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवरून सुरु असलेल्या वादावर अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल. आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील एक वाहक होणार असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायंच कारण नाही असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 



स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध

९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा यवतमाळमध्ये पार पडणार आहे. या साहित्य संमेलनासाठी उद्धाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध दर्शवला होता. आपल्या राज्यात तसंच देशात मराठी साहित्यिक असून त्यांचं साहित्य देशभरात वाचलं जातं. असं असताना मराठी साहित्य संमेलनाला इंग्रजी साहित्यिकांना का बोलावलं जातं, असा प्रश्न मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. 


सहगल यांचं स्वागत

या पार्श्वभूमीवर रविवारी संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका, असं एका पत्राद्वारं कळवलं होतं. यामुळं त्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं सहगल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी अधिकृत भूमिका ट्विट करत स्पष्ट केली. राज यांनी म्हटलं की,  यवतमाळ येथं होणाऱ्या साहित्य संमेलनाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांना प्रमुख उद्घाटक म्हणून आमंत्रण होतं. मात्र, याला माझ्या पक्षातील एका सहकाऱ्यानं विरोध केला असला तरी, अध्यक्ष या नात्यानं माझा याला अजिबात विरोध नाही. नयनतारा सहगल यांनी जरुर यावं, आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. 


मनसैनिकांना दम

सर्व मनसैनिकांनी यापुढे अशा संवेदनशील विषयावर भुमिका व्यक्त करताना माझ्याशी चर्चा करावी. त्याशिवाय कोणतीही भुमिका मांडू नये असा दमही राज यांनी भरला आहे. त्याशिवाय मराठी साहित्य संमेलन आपलं संमेलन आहे, सर्व मराठी जनाचं संमेलन आहे. या संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकाऱ्यांच्या भुमिकेमुळे झालेल्या मनस्तापाबाबत मी मराठी भाषा प्रेमी या नात्यानं दिलगिरी व्यक्त करतो. असंही राज यांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे. 




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा