Advertisement

गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची आईला चित्ररुपी भेट


गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची आईला चित्ररुपी भेट
SHARES

लालबाग-परळ येथील 'गुरूकुल स्कूल ऑफ आर्ट'च्या बालचित्रकारांनी रविवारी 'मातृदिना' निमित्त आपल्या आईला चित्ररुपी भेट दिली. या अमूल्य भेटीने उपस्थित सर्व माता भारावून गेल्या.
गुरुकुलचे बालचित्रकार जगभरात घडणाऱ्या घडामोडींवर नेहमीच विविध चित्रे रेखाटत असतात. त्यांच्या या कामगिरीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली आहे. या बालचित्रकारांनी रविवारी 'मातृदिना'च्या निमित्ताने आईला सुखद भेट देण्याची योजना आखली. 170 विद्यार्थ्यांनी आपापल्या मातेचे चित्र रेखाटून त्यांना हे चित्र सुपूर्द केले.

मुंबईतील विविध विद्यालय व महाविद्यालयांत शिकणारे विद्यार्थी लालबाग येथील 'गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट' मध्ये चित्रकलेचे धडे गिरवतात. या अभ्यासासाठी कुठल्याही वयोमर्यादेची अट नसल्याने विद्यार्थी मोठ्या उत्साहाने ही कला शिकण्यास येथे येतात. मात्र त्यासाठी जिद्द आणि चिकाटी असणे गरजेचे असल्याचे 'गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट'चे प्रशिक्षक सागर कांबळी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याचेही कांबळी म्हणाले.

चित्रकार हा एक जिज्ञासू कलाकार असतो. अशा कलाकाराच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी 'गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट' स्थापन करण्यात आले आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या बाल चित्रकारांना जगभरातील विविध घटनांवर व्यक्त होण्याची संधी मिळते, असे गुरुकुलचे अध्यक्ष पृथ्वीराज कांबळी यांनी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा