Advertisement

हॅप्पींच्या अदलाबदलीचा चायनीज खेळ

दमन सिंग बग्गा (जिमी शेरगिल) आणि पाकिस्तानी उस्मान आफ्रिदी (पियूष मिश्रा) एका कंटेनरमधून उतरतात ते थेट चीनमध्ये पोहोचतात. या दोघांनाही भारत आणि पाकिस्ताानमधून किडनॅप करून चीनमध्ये आणलेलं असतं. हे घडतं पंजाबमधून एकाच विमानाने आलेल्या नव्या आणि जुन्या हॅप्पींच्या अदलाबदलीमुळे. जिथे जुन्या हॅप्पीला पोहोचायचं असतं, तिथे नवी पोहोचते आणि घोळ सुरू होतो.

हॅप्पींच्या अदलाबदलीचा चायनीज खेळ
SHARES

‘हॅप्पी भाग जाएगी’च्या यशानंतर दिग्दर्शक मुदस्सीर अझीज यांनी ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’च्या रूपात या सिनेमाचा सिक्वेल बनवला आहे. पहिला भाग प्रेक्षकांना आवडल्यानंतर दुसऱ्या भागाकडून अपेक्षा खूप वाढतात. या सिनेमाच्या बाबतीतही असंच झालं आहे, पण पहिल्या भागाच्या तुलनेत दुसरा भाग फारसा प्रभावी वाटत नाही.


सिक्वेल बनवताना या सिनेमाच्या कथेत सुरुवातीपासूनच ट्विस्ट आणण्यात आले आहेत. यात पहिल्या भागातील मुख्य व्यक्तिरेखांच्या जोडीला काही नवीन व्यक्तिरेखाही पाहायला मिळतात. पहिल्या भागात पाकिस्ताानमधील कथानक होतं, तर दुसऱ्या भागात हॅप्पी थेट चायनामध्ये पोहोचली आहे. तिथे झालेली भागमभाग या सिनेमात आहे. मूळ कथानकात नवीन ट्रॅक्स ओपन करून पळापळ आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या सिनेमात दोन हरप्रीत कौर म्हणजेच हॅप्पी (डायना पेंटी आणि सोनाक्षी सिन्हा) आहेत. त्यामुळेच घोळ होतो आणि पुढे तो अधिकाधिक वाढतच जातो. हा घोळ इथे होऊ नये म्हणून जुनी आणि नवी हॅप्पी असा उल्लेख करूया. तर सिनेमाची सुरूवात आपले जुनेच दमन सिंग बग्गा (जिमी शेरगिल) आणि पाकिस्तानी उस्मान आफ्रिदी (पियूष मिश्रा) एका कंटेनरमधून उतरतात ते थेट चीनमध्ये पोहोचतात. 

या दोघांनाही भारत आणि पाकिस्ताानमधून किडनॅप करून चीनमध्ये आणलेलं असतं. हे घडतं पंजाबमधून एकाच विमानाने आलेल्या नव्या आणि जुन्या हॅप्पींच्या अदलाबदलीमुळे. जिथे जुन्या हॅप्पीला पोहोचायचं असतं, तिथे नवी पोहोचते आणि घोळ सुरू होतो. 


नवी हॅप्पी गुंडांच्या तावडीत सापडते, तर जुनी हॅप्पी पती गुड्डूसह (अली फझल) नव्या हॅप्पीच्या जागी युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर द्यायला पोहोचते. नवी हॅप्पी गुंडांच्या तावडीतून पळ काढते. तिची भेट अॅम्बेसीमध्ये काम करणाऱ्या खुशवंतसोबत (जस्सी गिल) होते. त्यानंतर जुन्या हॅप्पीसोबतच नव्या हॅप्पीच्या बालपणीच्या मित्राचा शोध आणि नव्या हॅप्पीला भारतात परत पाठवण्याचा चायनातील खेळ सुरू होतो.

विशेष म्हणजे लेखक मुदस्सीर अझीझ यांनी पहिल्या भागातील व्यक्तिरेखांचा दुसऱ्या भागातही मोठ्या खुबीने वापर केला आहे. पटकथा लिहितानाच त्यांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिल्याने खऱ्या अर्थाने मागच्या कथेचा पुढील भाग पाहायला मिळतो. या सिनेमात सुरुवातीपासून केवळ भागमभाग आहे. 

सिनेमाची गती वेगवान आहे, पण किडनॅप करून आणणाऱ्या गुंडांचा मूर्खपणा, अदनान चॅाऊ (डेन्झील स्मिथ) हाच सगळ्याचा सूत्रधार असू शकतो याचा संशय अगोदरच येणं, जुन्या हॅप्पीचा शोध पूर्ण चीनभर घेण्याऐवजी थेट युनिव्हर्सिटी न गाठणं, खुशवंतला मध्येच झटके येणं हे जराही विनोदी वाटत नाही. उलट बालीश वाटतं. बरं या सिनेमाला मॅड काॅमेडी म्हणावं तर तसं पोट दुखेपर्यंत हसूही येत नाही.


एकाच नावाच्या दोन व्यक्तींच्या अदलाबदलीचा घोळ ही संकल्पना तशी नवी नसली तरी त्यातही काही नवीन पैलू जोडता आले असते. एखादं मोठं डील करण्यासाठी झालेलं किडनॅपिंग हा देखील घासून गुळगुळीत झालेला फाॅर्म्युला आहे. काही सीन अनावश्यक आणि वेळकाढू आहेत. कलाकारांच्या अॅक्शन-रिअॅक्शन्स आणि संवादांमधून थोडेफार विनोद झाले आहेत. 

कॅमेरावर्क छान असल्याने चीनमधील लोकेशन्स पाहता येतात. संकलन, कला दिग्दर्शन या बाजूही चांगल्या आहेत. ‘कुडीये ने तेरे...’ हे जुन्या शैलीतील गाणं ऐकायला आणि बघायला छान वाटतं. टायटल ट्रॅकही चांगलं आहे. पटकथेतील उणिवा दूर करता आल्या असत्या तर पुन्हा एकदा हॅप्पीची भागमभाग लक्ष वेधून घेणारी ठरली असती.


हॅप्पीच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा पक्की पंजाबन वाटते. देहबोलीपासून संवादफेकीपर्यंत आणि लुकपासून अॅटीट्युडपर्यंत सर्वच बाबतीत सोनाक्षीने बाजी मारली आहे. जस्सी गिलने आपलं काम चोख बजावलं असलं तरी सोनाक्षीसोबत त्याची जोडी खटकते. डायना पेंटी आणि अली फजल यांच्या जोडीची केमिस्ट्री पहिल्या भागातही पाहायला मिळाली होती. 


या सिनेमातही त्याची छोटीशी झलक पाहायला मिळते. जिमी शेरगिल आणि पियूष शर्मा यांच्या जोडीने पुन्हा कमाल करत काही विनोदी क्षण दिले आहेत. मुख्य खलनायकाच्या भूमिकेत डेन्झील स्मिथ खूपच तकलादू वाटतात. अपारशक्ती खुरानाने छोट्याशा भूमिकेतही चांगलं काम केलं आहे.

या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या, पण पटकथेतील उणीवा आणि नावीन्याचा अभाव यामुळे हा सिनेमा म्हणजे केवळ नव्या हॅप्पीची चीनमधील अदलाबदल आणि पळापळ आहे असंच म्हणावं लागेल.


दर्जा : ** 
.........................

चित्रपट : हॅप्पी फिर भाग जाएगी
निर्माते  : आनंद एल. राय, कृषिका लुल्ला
लेखन व दिग्दर्शन : मुदस्सीर अझीझ
कलाकार : सोनाक्षी सिन्हा, जस्सी गिल, डायना पेंटी, अली फझल, जिमी शेरगील, पियूष मिश्रा, डेन्झील स्मिथ, अपारशक्ती खुराना, जेसन थॅम



हेही वाचा -

मूठभर ‘स्वप्न’ आणि ‘ट्रकभर’ पसारा!

शाहिद स्वत:ला मानतो लकी!





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा