'तानाजी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अजय-सैफ पुन्हा भिडणार

पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर तानाजी मालुसरे या शिवरायांच्या मावळ्याचा पराक्रम हिंदी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

SHARE

हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या अनेक मावळ्यांपैकी एक होते तानाजी मालुसरे. शाळेच्या पुस्तकात आपण यांची कहाणी वाचली असेल. आपल्या आजी-आजोबांकडून यांच्या गोष्टी देखील ऐकल्या असतील. परंतू पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर तानाजी मालुसरे या शिवरायांच्या मावळ्याचा पराक्रम हिंदी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

कोंढणा किल्ला जिंकण्यासाठी प्राणांची बाजी लावणारे तानाजी मालुसरे पहिल्यांदाच चित्रपटाच्या तानाजी द अनसंग वॉरीयर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.


तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय देवगण तर उदयभानच्या भूमिकेत सैफ अली खान झळकणार आहे. १७ व्या शतकात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये कोंढणा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांचा हा पराक्रम सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ३ डी माध्यमातूनही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

तानाजी हा चित्रपट ओम राऊत या मराठमोळ्या दिगदर्शकाचा आहे. १० जानेवारी २०२० या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे. जवळपास १२ वर्षांनंतर काजोल- अजय देवगण ही रिअल लाईफ जोडी एकत्र काम करणार आहे. तानाजी या सिनेमाच्या माध्यमातून काजोल मराठमोळ्या आणि ऐतिहासिक भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

'तानाजी'मध्ये खलनायकाच्या अंदाजात सैफ अली खान झळकणार आहे. अजय आणि सैफ १४ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. आत्तापर्यंत त्यांनी ३ चित्रपट एकत्र केले असून हा त्यांचा चौथा चित्रपट आहे. ओमकारा या चित्रपटात त्यांनी शेवटचं एकत्र काम केलं होतं. २००६ साली ओमकारा प्रदर्शित झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर तर तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई काजोल साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे लूक शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे या सिनेमाची सोशल मीडियामध्ये चर्चा आहे.



हेही वाचा

१२ वर्षांनंतर अजय-काजोल एकत्र, 'तानाजी' चित्रपटातील काजोलचा मराठमोळा अंदाज


संबंधित विषय
ताज्या बातम्या