सर्वसामान्यांवर प्रभाव टाकणाऱ्या अभिनेत्यांनी मद्य, सिगारेट वा तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करू, नये अशी विनंती एका कॅन्सरग्रस्त चाहत्याने काही दिवसांपूर्वी बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण याला केली होती. त्यावर मी तंबाखूची नाही, तर पान मसाल्याची जाहिरात करत असल्याचं उत्तर अजयने दिलं आहे.
नानकराम मीणा असं या कॅन्सरग्रस्ताचं नाव आहे. ते जयपूरमध्ये राहतात. नानकराम अजयचे मोठे चाहते असून अजयची गुटख्याची जाहिरात बघून त्यांनीही गुटख्याचं सेवन सुरु केलं. परंतु काही वर्षांनी त्यांना कॅन्सर झाल्याने त्यांना आपली चूक कळली. त्यानंतर त्यांनी जयपूरमधील सांगानेर, जगतपुरा आणि परिसरात तंबाखू, गुटख्याच्या सेवनामुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देणारी १ हजार पत्रकं वाटली तसंच अजयला भावनिक पत्र लिहित तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात न करण्याची विनंती देखील केली.
त्याला उत्तर देताना अजयने म्हटलं आहे की, 'कुठलीही जाहिरात करण्याआधी मी तंबाखूची जाहिरात करणार नाही असा करार करतो. मी जी जाहिरात केली तंबाखूची नसून पान मसाल्याची आहे. कंपनीसोबत केलेल्या करारामध्ये या पान मसाल्यात तंबाखू नसल्याचं म्हटलं आहे.'
हेही वाचा-
गुटख्याची जाहिरात करू नकोस, अजयला कॅन्सरग्रस्त चाहत्याची विनंती