Advertisement

भरकटलेली 'केदारनाथ'ची यात्रा!

मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लीम किंवा मुलगी मुस्लीम आणि मुलगा हिंदू... त्यातून निर्माण होणारं धार्मिक युद्ध यापूर्वी बऱ्याच चित्रपटात पाहिलेलं आहे. त्यामुळे पूर्वी घासून गुळगुळीत झालेला फॅार्म्युलाच या चित्रपटातही वापरण्यात आला आहे. यातील कॅमेरावर्क आणि स्पेशल इफेक्ट्स मात्र नावीन्यपूर्ण आणि मनमोहक आहेत.

भरकटलेली 'केदारनाथ'ची यात्रा!
SHARES

वास्तववादी घटनांच्या पार्श्वभूमीवर एखादी काल्पनिक कथा रेखाटून यशाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न यापूर्वी बऱ्याच दिग्दर्शकांनी केला आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरने या चित्रपटातही तोच प्रयत्न केला आहे. २०१३ मध्ये केदारनाथवर बरसलेल्या आस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर अभिषेकने तिथल्याच तरुण-तरुणीची प्रेमकथा रेखाटली आहे. ज्यात हिंदू-मुस्लीम तेढही निर्माण केलं आहे.


गुळगुळीत झालेला फॅार्म्युला

मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लीम किंवा मुलगी मुस्लीम आणि मुलगा हिंदू... त्यातून निर्माण होणारं धार्मिक युद्ध यापूर्वी बऱ्याच चित्रपटात पाहिलेलं आहे. त्यामुळे पूर्वी घासून गुळगुळीत झालेला फॅार्म्युलाच या चित्रपटातही वापरण्यात आला आहे. यातील कॅमेरावर्क आणि स्पेशल इफेक्ट्स मात्र नावीन्यपूर्ण आणि मनमोहक आहेत. त्याला कलाकारांच्या अभिनयाची साथ लाभल्याने चित्रपटगृहात बसून केदारनाथपर्यंतचा प्रवास काहीसा सुखकर वाटतो.


कथा काय?

चित्रपटाची सुरुवात एका नयनरम्य दृश्याने होते. केदारनाथमधील नदी, डोंगर, दऱ्या आणि तिथलं एकूणच निसर्गसौंदर्य दाखवत कॅमेरा तिथे आलेल्या पर्यटकाला पाठीवर डोलीत बसवून घेऊन जाणाऱ्या नायकावर म्हणजेच मंसूरवर (सुशांत सिंग राजपूत) खिळतो. मुस्लीम असूनही केदारनाथच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्यात मंसूर धन्यता मानत असतो. त्याचे वडीलही अशीच सेवा करताना अपघाती मृत्यू पावलेले असतात.

दुसरीकडे केदारनाथ मंदिरातील मुख्य पुजारी (नितीश भारद्वाज)यांचा भाचा कुल्लू (निशांत दहिया) केदारनाथमध्ये फाइव्ह स्टार हॅाटेल बांधण्याच्या तयारीत असतो. पुजारीची मुलगी मंदाकिनी उर्फ मुक्कूचा (सारा अली खान) साखरपुडा कुल्लूशी झालेला असतो. मंसूरची सेवाभावी वृत्ती मुक्कूला जाणवत असते. त्यामुळे ती त्याच्या जवळ येते आणि हळूहळू दोघं एकमेकांवर प्रेम करू लागतात. अखेरीस दोन प्रलय येतात. एक निसर्गाचा आणि दुसरा प्रेमाचा...


कॅमेरावर्क प्लस पॅाइंट

चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट आहे कॅमेरावर्क. सिनेमॅटोग्राफर तुषार कांती राय यांनी या चित्रपटासाठी अफलातून छायांकन केलं आहे. त्यामुळे मुळातच सुंदर असलेल्या केदारनाथच्या आजूबाजूचा परिसर पडद्यावर आणखी खुलून दिसतो. कथा कमकुवत असल्याचा फटका या चित्रपटाला सहन करावा लागला आहे. कथेत ट्विस्ट नाहीत. सरळ वाटेने जाणारी पटकथा उत्कंठा वाढवण्यात अपयशी ठरते. या चित्रपटात एक नवीन जोडी आहे, पण त्यांच्यातील केमिस्ट्री तितकीशी प्रभावी वाटत नाही.


रोमान्स गायब

हिंदू-मुस्लीम तेढ हा जुनाच मुद्दा पुन्हा उचलून प्रेमकथेला धार्मिक रंग देण्यात आला आहे. केदारनाथमध्ये आलेल्या महाभयंकर प्रलयाचा या प्रेम कथेशी काडीचाही संबंध नाही. खरं तर ही लव्ह स्टोरी आहे, पण यातून रोमान्सच गायब आहे. प्रेम कथेचा आधार घेऊन केदानाथवर आलेल्या नैसर्गिक संकटाची कारणमीमांसा करण्याची खरी गरज होती. अमित त्रिवेदीच्या आवाजातील 'नमो नमोजी शंकरा...' आणि अरिजीत सिंग-निकीता गांधी यांच्या आवाजातील 'काफीराना...' ही गाणी चांगली झाली आहेत. यासोबतच स्पेशल इफेक्ट्स खूप सुरेख आहेत. विशेषत: केदारनाथ मंदिरात पाणी शिरण्याचा आणि त्यानंतरची दृश्ये छान झाली असून त्या वेळच्या वास्तव परिस्थितीची जाणीव करून देणारी आहेत.


उत्तम अभिनय

सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटातील प्रत्येक दृश्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. पहिल्या दृश्यापासून अखेरच्या दृश्यापर्यंत मंसूरचा सजीव करणारा त्याचा अभिनय पाहण्याजोगा आहे. सारा अली खानने पहिल्याच चित्रपटात एका नखरेल मुलीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली असली तरी सुशांत आणि तिची रोमँटिक केमिस्ट्री मिसींग वाटते. नितीश भारद्वाज बऱ्याच दिवसांनी रुपेरी पडद्यावर झळकले असून त्यांनी काहीशा ग्रे शेडेड भूमिकेत छान रंग भरले आहेत. पूजा गोरने साकारलेली ब्रिंदाही लक्षात राहते. निशात दहियाने आपली भूमिका कुठेही अतिशयोक्ती न करता साकारली आहे.


या चित्रपटाततील लव्ह स्टोरी तितकीशी प्रभावी नसली तरी निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा तो कशा प्रकारे तांडव करून सारं काही उद्ध्वस्त करतो ते पाहण्यासाठी केदारनाथची यात्रा करायला हरकत नाही.

दर्जा : **
..............................

चित्रपट-केदारनाथ

निर्माते-रॅानी स्क्रूवाला, प्रग्या कपूर, अभिषेक कपूर, अभिषेक नायर

दिग्दर्शक-अभिषेक कपूर

लेखक-अभिषेक कपूर, कनिका धिल्लन

कलाकार-सुशांत सिंग राजपूत, सारा अली खान, नितीश भारद्वाज, अलका आमीन, सोनाली सचदेव, पूजा गोर, निशांत दहिया



हेही वाचा-

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

पहा, यामीच्या हॅाट अदा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा