Advertisement

विद्या बालन स्पेशल...'तुम्हारी सुलु'!


विद्या बालन स्पेशल...'तुम्हारी सुलु'!
SHARES

आपल्या कसदार अभिनयानं प्रेक्षकांच्या अपेक्षा नेहमीच पूर्ण करणारी अभिनेत्री विद्या बालन पुन्हा एकदा एक दमदार भूमिका प्रेक्षकांसाठी घेऊन आली. विद्या बालन स्टारर फिल्म 'तुम्हारी सुलु' प्रदर्शित झाला. आणि अर्थात, विद्याच्या इतर भूमिकांप्रमाणेच 'तुम्हारी सुलू' सिनेमातल्या भूमिकेनंही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.


दमदार कथेला विद्याच्या अभिनयाची जोड

एक मध्यमवर्गीय महिला सुलोचना उर्फ सुलुची (विद्या बालन) ही कथा आहे. ती पती अशोक दुबे  (मानव कौल) आणि मुलगा प्रणव यांच्यासोबत विवारमध्ये राहते. गृहिणी असलेली सुलु प्रत्येक स्पर्धांमध्ये भाग घेत असते. मग ती चमचा-लिंबूची शर्यत असो वा रेडिओवरील एखादी स्पर्धा असो. या स्पर्धांमधून ती वेगवेगळी बक्षिसं जिंकत असते. एकदा ती तिचे बक्षीस घेण्यासाठी रेडिओ स्टेशनला जाते. तिकडे रेडिओ जॉकिचे ऑडिशन सुरू असते. तेव्हा तिच्याही मनात रेडिओ जॉकी होण्याची इच्छा निर्माण होते. विशेष म्हणजे ती इंटरव्ह्यू देते आणि तिला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देखील मिळते. सुलुला लेट नाइट शो तुम्हारी सुलु दिला जातो. शोला चांगला प्रतिसाद मिळतो. पण घरातल्या गोष्टींकडे मात्र तिचं दुर्लक्ष होऊ लागतं. शो आणि कुटुंब यात सुलु कसा ताळमेळ साधते? शोमुळे तिच्या कौटुंबिक आयुष्यावर काय परिणाम होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हारी सुलु चित्रपट पाहिल्यानंतर मिळतात.


चित्रपटाचे दिग्दर्शन

सुरेश त्रिवेणी यांनी काही शॉर्ट फिल्म केल्या आहेत. बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे. पण तुम्हारी सुलु पाहून तुम्हाला याची जाणीव देखील होणार नाही. कथेची मांडणी खूप साध्या पद्धतीनं केली आहे. चित्रपटातील पात्र प्रत्येकाशी संवाद साधत आहेत की काय असंच जाणवत रहातं.


चित्रपटाला साजेसं संगीत

फिल्मचं म्यूझिक कथेच्या हिशोबानं अगदी योग्य आहे. 'बन जा तू मेरी रानी' आणि 'हवा हवाई' या दोन्ही गाण्यांनी चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.  


चित्रपटाची स्टारकास्ट

सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित तुम्हारी सुलुमध्ये विद्यासोबत मानव कौल, नेहा धुपिया आणि आरजे मलिष्का यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनयाविषयी बोलायचं झालं तर, विद्या बालननं पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत. सुलुच्या रोलमध्ये ती एकदम फिट आहे. एक सर्वसामान्य गृहिणी तिनं खूप चांगल्या प्रकारे रंगवली आहे. एका चित्रपटात तिनं म्हटलं होतं की, चित्रपट फक्त तीन कारणांनी चालतात आणि ते म्हणजे एन्टरटेंन्मेंट, एन्टरटेंन्मेंट, एन्टरटेंन्मेंट. विद्या बालननं तिचाच हा डायलॉग प्रत्यक्ष खरा करून दाखवला आहे.

मानव कौरच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं खूप चांगला अभिनय केला आहे. त्यानं विद्याच्या पतीच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे. मानव कौर आणि विद्या बालन यांच्यातील केमिस्ट्री देखील जबरदस्त आहे. नेहा धुपियानं छोटी पण चांगली भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून आरजे मलिष्का पहिल्यांदाच स्क्रिनवर झळकली आहे.  



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा