Advertisement

Movie Review: आता 'सिंबा'ची पण सटकली!

'सिंबा' हा रोहितच्या यापूर्वीच्या 'सिंघम'चा पुढील भाग असेल असं काहींना वाटलं असेल, पण तसं नाही. रोहितने या सर्व कल्पनांना छेद देत एक अशी कथा सादर केली आहे, ज्यात 'सिंबा'ची कमालही पाहायला मिळते आणि 'सिंघम'ची धमालही दिसते.

Movie Review: आता 'सिंबा'ची पण सटकली!
SHARES

रोहित शेट्टीचा चित्रपट म्हटला की सर्वसामान्य प्रेक्षकांपासून विचारवंतांपर्यंत सर्वांसाठीच फूल टू मनोरंजनाची पर्वणी असते. 'सिंबा' हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. मागचा पुढचा कसलाही विचार न करणारा स्वच्छंदी नायक. आयुष्यात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळे जवळची व्यक्ती गमावतो आणि नंतर भानावर आल्यावर त्या नायकाने पुकारलेला लढा. ही कथा यापूर्वीही बऱ्याचदा चित्रपटांमध्ये आली असली तरी 'सिंबा'ची स्टोरी रोहितने मनोरंजनाचे सर्व मसाले सम प्रमाणात वापरून आपल्या शैलीत सादर केल्याने ती पाहताना एक वेगळीच गंमत जाणवते.


'सिंबा' हा रोहितच्या यापूर्वीच्या 'सिंघम'चा पुढील भाग असेल असं काहींना वाटलं असेल, पण तसं नाही. रोहितने या सर्व कल्पनांना छेद देत एक अशी कथा सादर केली आहे, ज्यात 'सिंबा'ची कमालही पाहायला मिळते आणि 'सिंघम'ची धमालही दिसते. यावेळीही रोहितने प्रेक्षकांना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला खूप वाव दिला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रणवीर सिंहचा एक निराळाच अंदाज पाहायला मिळतो. रणवीरची ही स्टाइलही प्रेक्षकांना भावणारी आहे.


कथा काय आहे?

सिंघमच्या (अजय देवगण) धडाकेबाज स्टाइलने प्रभावित झालेला अनाथ लहान मुलगा सिंबा म्हणजेच संग्राम भालेराव (रणवीर सिंह) त्याच्याप्रमाणेच पोलिस अधिकारी बनण्याचं स्वप्न बघतो. प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या बळावर तो पोलिस अधिकारी बनतो. मिरामार पोलिस स्टेशनमध्ये त्याची बदली होते आणि कथानकात खलनायकाची एंट्री होते. दुर्वा रानडे (सोनू सूद) हा तिथल्या अनधिकृत व्यवसायाचा बादशहा असतो. गौरव आणि सदाशिव (सौरभ गोखले, अमृत सिंह) हे त्याचे दोन भाऊ पबच्या आड ड्रग्ज विक्री करत असतात.


सिंबाची हातमिळवणी पण...

दुर्वाची इतर अनधिकृत कामं अधिकृत करण्यासाठी सिंबा त्याच्याशी हातमिळवणी करतो, पण तो ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचं त्याला ठाऊक नसतं. मेडिकलला शिकणारी आकृती दवे (वैदेही परशुरामी) ही तरुणी रात्री रस्त्यावरील अनाथ मुलांना शिकवण्याचं काम करत असते. सिंबाला ही गोष्ट खूप भावते आणि तो तिला आपली लहान बहीण मानतो. गौरव-सदाशिव लहान मुलांच्या शाळेच्या बॅगमधून ड्रग्जची ने-आण करत असतात. आकृतीला त्याची कुणकुण लागते आणि ती छोटूला (साहिल जोशी) घेऊन त्यांच्या पबवर पोहोचते. त्यानंतर एक अशी घटना घडते जी सिंबाचे डोळे उघडण्यासाठी पुरेशी ठरते.


धडाकेबाज शैली

चित्रपटाच्या कथानकात जरी नावीन्य नसलं तरी त्यातील मुलींवरील अत्याचाराचा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. रोहितने हा चित्रपट आपल्या नेहमीच्या शैलीत बनवला नसून त्याला काहीशी वेगळी ट्रिटमेंट दिली असल्याची जाणीव चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून होते. मध्यंतरानंतर खऱ्या अर्थाने रोहितची धडाकेबाज शैली पाहायला मिळते. या चित्रपटात केवळ हाणामारी नसून, मानवी भावबंधही अतिशय अलवारपणे गुंफण्यात आले आहेत. त्यामुळे काही दृश्ये अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. रणवीरची वेगळी शैली या चित्रपटातील खरी गंमत आहे. त्याच्या लकबी, चालणं, बोलणं, कधी कॅामेडी करणं, तर कधी इंटेंस लूक देत समोरच्याला हैराण करणं सारं काही लक्ष वेधून घेणारं आहे.


संथ गती

हा चित्रपट जरी रोहित शेट्टीचा असला तरी त्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत याची गती काहीशी संथ वाटते. मध्यंतरापूर्वीच्या भागाच्या तुलनेत मध्यंतरानंतर ती आणखीच मंदावते. न्यायालयातील खटला आणि त्यातील दृश्यांमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट असून, त्यातील सत्य आकडेवारी मन विषण्ण करणारी आहे. अत्याचारांना घाबरून घरी बसायचं नाही तर त्यांचा थरकाप उडवायचा हा विचार चित्रपटात पाहायला चांगला वाटत असला तरी वास्तवात मात्र असं चित्र कधीच दिसणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या चित्रपटांनंतर अत्याचाराच्या घटनांना किती आळा बसू शकेल हे एक अनाकलनीय कोडंच आहे.


सिंघमची एंट्री

तांत्रिकदृष्ट्या चित्रपट खूपच तगडा आहे. छायांकन, साहसदृश्ये, लोकेशन्स, पार्श्वसंगीत, संगीत या सर्व जमेच्या बाजू आहेत. गाण्यांमधील लोकेशन्स आणि कॅमेरावर्क मनमोहक आहे. संकलनात थोडी ढिलाई झाल्यासारखी वाटते. 'आँख मारे...', 'आला रे आला...', 'बंदेया रे बंदेया...' ही गाणी श्रवणीय आहेत. चित्रपटाचा क्लायमॅक्स आश्चर्यचकित करणारा आहे. क्लायमॅक्समध्ये अचानक बाजीराव सिंघमची (अजय देवगण)एंट्री होते आणि सिंबासोबत तो खलनायकाची यथेच्छ धुलाई करतो. या चित्रपटात १४ मराठी कलाकार असल्याने प्रत्येक दृश्यामध्ये चार-पाच तरी मराठी चेहऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपण एखादा मराठमोळा चित्रपटच पाहतोय की काय असं वाटतं. चित्रपटाच्या अखेरीस एटीएसमध्ये प्रमोशन मिळालेल्या सूर्यवंशीची (अक्षय कुमार)एंट्री रोहितच्या पुढच्या चित्रपटाची चाहूल देण्यासाठी पुरेशी आहे.


रणवीरचं वेगळं रुप

रणवीर सिंहचं एक वेगळं रूप या चित्रपटात पाहायला मिळतं. त्याने केलेली कॅामेडी जितकी भावते तितकीच अॅक्शनही मनात घर करते. सारा अली खान जरी नायिका असली तरी तिच्या वाट्याला फारसं काम आलेलं नाही. प्रेमथेच्या ट्रॅक पुरताच तिचा वापर करण्यात आला आहे. तिने आपलं काम चांगल्या प्रकारे केलं आहे. आशुतोष राणाने हेड कॅान्स्टेबलची भूमिका साकारताना सिंबासोबतची जुगलबंदी छान रंगवली आहे. अजय देवगणची छोटीशी भूमिका कथानकात महत्त्वाचं वळण आणणारी आहे.


भूमिकेला न्याय

वैदेही परशुरामीसाठी हा फार मोठा ब्रेक असून तिने आपल्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. मुख्य खलनायकाच्या भूमिकेत सोनू सूद पुन्हा एकदा लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. खलनायकाची भूमिका सौरभ गोखलेने संपूर्ण ताकदीनिशी साकारली आहे. याशिवाय विजय पाटकर, अरुण नलावडे, सिद्धार्थ जाधव, नेहा महाजन, सुचित्रा बांदेकर, नंदू माधव, सुलभा आर्या, साहिल जोशी, अशोक समर्थ, अश्विनी काळसेकर, गणेश यादव यांनी चांगलं काम केलं आहे. पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि करण जोहर यांची झलक पाहायला मिळते.


आजवर बऱ्याचदा समोर आलेलं कथानक रोहितने मनोरंजक पद्धतीने एका वेगळ्याच शैलीत सादर केल्याने नावीन्यपूर्ण वाटतं. रणवीर सिंहसोबत अजय देवगण आणि इतर कलाकारांचा पैसा वसूल अभिनय 'सिंबा'ला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा आहे. त्यामुळे एकदा तरी हा चित्रपट पाहण्याचा मोह प्रत्येकाला होईल यात शंका नाही.

दर्जा : ***१/२
.........................

हिंदी चित्रपट: सिंबा

निर्माते: करण जोहर, हिरू यश जोहर, रोहित शेट्टी, अपूर्वा मेहता

दिग्दर्शक: रोहित शेट्टी

लेखक: युनूस साजवाल, साजिद सामजी

कलाकार: रणवीर सिंह, सारा अली खान, अजय देवगण, सोनू सूद, आशुतोष राणा, वैदेही परशुरामी, सौरभ गोखले, अमृत सिंह, विजय पाटकर, अरुण नलावडे, सिद्धार्थ जाधव, नेहा महाजन, सुचित्रा बांदेकर, नंदू माधव, सुलभा आर्या, साहिल जोशी, अशोक समर्थ, अश्विनी काळसेकर, गणेश यादव



हेही वाचा-

'सिंबा'च्या मागे ११ मराठमोळ्या कलाकारांची फौज

'ठाकरे'ची वाट कुणीही अडवू शकत नाही- संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा