Advertisement

बँक कर्मचाऱ्यांचा १५, १६ मार्चला संप, बॅंकिंग सेवा कोलमडणार

राष्ट्रीयीकृत बँकांचं खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली संप पुकारण्यात आला आहे.

बँक कर्मचाऱ्यांचा १५, १६ मार्चला संप, बॅंकिंग सेवा कोलमडणार
SHARES

राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी संघटनेने १५ व १६ मार्चला संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकांचे व्यवहार विस्कळीत होणार आहेत. १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवार आणि नंतर सोमवार, मंगळवारी संप असणार आहे. त्यामुळे सलग चार दिवस सरकारी बँकाचं कामकाज ठप्प होणार आहे. 

राष्ट्रीयीकृत बँकांचं खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली १५ आणि १६ मार्च संप पुकारण्यात आला आहे.  नऊ बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांचे सदस्य या संपात सहभागी होणार आहेत.

गुरुवार ११ मार्चला महाशिवरात्रीनिमित्त बँकांचे व्यवहार बंद आहेत. तर चालू आठवड्यात शनिवार व रविवारी बँका बंद आहेत. त्यामुळे लागून होणाऱ्या दोन दिवसांच्या संपामुळे बँकांचे व्यवहार विस्कळीत होणार आहेत.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन (एआयबीओसी), नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज (एनसीबीई), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), बँक एम्प्लॉइज कॉन्फडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय), इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन (आयएनबीईएफ), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (आयएनबीओसी), नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) आणि ‘नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक ऑफिसर्स (एनओबीओ) या संघटना संपात सहभागी होणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेत सादर करताना आयडीबीआय बँकेव्यतिरिक्त दोन राष्ट्रीयीकृत बँकांचं खासगीकरण करणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर एका सार्वजनिक सर्वसाधारण विमा कंपनीचेही नव्या आर्थिक वर्षात खासगीकरण करण्यात येईल, असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा