Advertisement

थर्टी फर्स्टचा बट्ट्याबोळ? बाजारातून बियर गायब

दीड महिन्यांपूर्वी राज्य उत्पादक शुल्क विभागाने माईल्ड बियरच्या उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे संतापलेल्या बियर उत्पादक कंपन्यांनी गेल्या ३ आठवड्यांपासून माईल्ड बियरचं उत्पादन बंद केलं आहे. त्यामुळे आठवड्याभरापासून बाजारात माईल्ड बियरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

थर्टी फर्स्टचा बट्ट्याबोळ? बाजारातून बियर गायब
SHARES

थर्टी फर्स्टला 'झिंगाट' होऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीत असलेल्या मद्यप्रेमींसाठी एक बॅडन्यूज आहे. एेन थर्टी फर्स्टच्या मुहूर्तावर बाजारातून बियर गायब झाल्याने सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असलेल्या मद्यप्रेमींची निराशा होऊ शकते, हे नक्की.


उत्पादन शुल्कात वाढ

दीड महिन्यांपूर्वी राज्य उत्पादक शुल्क विभागाने माईल्ड बियरच्या उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. या शुल्कवाढीवर बियर उत्पादक कंपन्यांनी नाराजी व्यक्त करत शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी उत्पादन शुल्क विभागाकडे केली होती. तसेच उत्पादन शुल्कात कपात करणं शक्य नसेल, तर बियरच्या किंमतीत वाढ करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही बियर उत्पादक कंपन्यांकडून केली जात आहे. मात्र या मागण्यांकडे उत्पादन शुल्क विभाग कानाडोळा करत असल्याने बियर उत्पादक कंपन्या आक्रमक झाल्या आहेत.



३ आठवड्यांपासून उत्पादन बंद

त्यानुसार संतापलेल्या बियर उत्पादक कंपन्यांनी गेल्या ३ आठवड्यांपासून माईल्ड बियरचं उत्पादन बंद केलं आहे. त्यामुळे आठवड्याभरापासून बाजारात माईल्ड बियरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत तर माईल्ड बियर बाजारातून गायब झाल्याची माहिती 'महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशन'चे अध्यक्ष दिलीप ग्याज्ञानी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. एवढंच नाही, तर बियर उत्पादक कंपन्यांनी स्ट्राँग बियरचं उत्पादनही कमी केल्याने बाजारत स्ट्राँग बियरचीही टंचाई जाणवणार असल्याचं ग्याज्ञानी यांनी सांगितलं.


मुंबईत बियर येणंच बंद

मुंबईत महिन्याला १५ लाख माईल्ड बियरच्या पेट्या बाजारात यायच्या. तिथे गेल्या २ आठवड्यांपासून ३ लाख पेट्या येत अाहेत. पण मागील २ दिवसांपासून तर बियरच्या पेट्या येणंच बंद झालं आहे. त्यामुळे आता मुंबईतील बऱ्याचशा वाईन शाॅपमध्ये बियरचा साठा नसल्याने ग्राहकांची पंचाईत होत असून विक्रेत्यांचंही मोठं नुकसान होत असल्याचं ग्याज्ञानी यांनी स्पष्ट केलं.



३० टक्के ग्राहक बियर पिणारे

आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार एकूण ग्राहकांच्या ३० टक्के ग्राहक हा बियर पिणारा असतो. त्यातही बियरमध्ये खूप कमी प्रमाणात अल्कोहोल असतं आणि बियरमधील काही घटक हे शरिरासाठी पोषक असतात.


थर्टी फर्स्टला फटका

सर्वच वयोगटातील त्यातही २१ ते ३५ वयोगटातील ग्राहकांचा कल बियर खरेदीकडे जास्त असतो. असं असताना सध्या बियर मिळत नसल्याने ग्राहकांमध्येही नाराजी पसरली असून त्याचा फटका बार आणि रेस्टाॅरन्टला बसत आहे. थर्टी फर्स्टच्या काळात हा फटका अधिक प्रमाणात जाणवेल, असंही शेट्टी यांचं म्हणणं आहे.



कुठल्या बियरचं उत्पादन बंद?

किंगफिशर, एलपी, टुबोर्ग आणि कार्ल्सबर्ग यासारख्या नामांकित ब्रँडच्या माईल्ड बियरचं उत्पादन बंद असल्याने या ब्रॅण्डची बियर बाजारातून गायब झाली आहे. ही परिस्थिती आणखी आठवडाभर अशीच राहिली, सरकारने याकडे लक्ष दिलं नाही तर नुकसान आणखी वाढेल, असं म्हणत 'महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशन'सह 'आहार'ने यातून त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली आहे.


काही कंपन्यांचं उत्पादन बंद

बियरच्या विक्रीतून उत्पादन शुल्क विभागाला, राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो. पण बाजारात बियरची विक्री घटल्याने त्याद्वारे सरकारलाही आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. यासंबंधी अश्विनी जोशी, आयुक्त, उत्पादन शुल्क यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरसकट नव्हे, तर काही कंपन्यांनी उत्पादन बंद केल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी उत्पादन कंपन्यांच्या मागणीवर विभाग काय विचार करतंय, यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा