Advertisement

बॅण्डस्टॅण्डवरचं 'सी रॉक' पुन्हा आकार घेणार!

एकेकाळी सिनेसृष्टीतील मातब्बर, मोठमोठे उद्योगपती आणि स्टार खेळाडूंसाठी प्रमुख आकर्षण असणारं हे हॉटेल पुन्हा बांधलं जाणार आहे. आणि तेही अधिक भव्य स्वरूपात! या हॉटेलचे मालक असलेला 'द ताज ग्रुप' या ठिकाणी तब्बल ३१ मजल्यांचं नवीन हॉटेल बांधणार आहे.

बॅण्डस्टॅण्डवरचं 'सी रॉक' पुन्हा आकार घेणार!
SHARES

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये घरघर लागलेलं आणि कालांतरानं नामशेष झालेलं वांद्र्याच्या बॅण्डस्टॅण्ड परिसरातलं 'सी रॉक' हॉटेल आता पुन्हा अवतरणार आहे! एकेकाळी सिनेसृष्टीतील मातब्बर, मोठमोठे उद्योगपती आणि स्टार खेळाडूंसाठी प्रमुख आकर्षण असणारं हे हॉटेल पुन्हा बांधलं जाणार आहे. आणि तेही अधिक भव्य स्वरूपात! या हॉटेलचे मालक असलेला 'द ताज ग्रुप' या ठिकाणी तब्बल ३१ मजल्यांचं नवीन हॉटेल बांधणार आहे.


कधी अस्तित्वात आलं 'सी रॉक'?

बॅण्डस्टॅण्ड परिसरातलं 'सी रॉक' हॉटेल १९७८ मध्ये पहिल्यांदा बांधून पूर्ण झालं. जुहूमध्येच रहाणारे यू. बी. ल्युथ्रिया यांनी हे हॉटेल बांधलं होतं. त्यानंतर प्रसिद्ध अशा शेरेटन कंपनीशी सहकार्य करार झाल्यानंतर हॉटेलचं नाव झालं 'वेलकम ग्रुप सीरॉक शेरेटन'!


१९९३चा तो 'काळा' दिवस!

त्यानंतर थेट १९९३पर्यंत 'सी रॉक'नं मुंबईच नाही, तर जगभरातल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला. पण, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे 'सी रॉक' हॉटेलचं मोठं नुकसान झालं. दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटामुळे 'सी रॉक'चे अनेक मजले उध्वस्त झाले.



'सी रॉक'ची कोट्यवधींना खरेदी

२००५मध्ये क्लेरिजेस हॉटेल ग्रुपने तब्बल ३३० कोटी रूपयांना हे उध्वस्त हॉटेल खरेदी केलं. पुढच्या पाच वर्षांमध्ये हॉटेलबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. २००९मध्ये टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीनं हे हॉटेल ६८० कोटींना खरेदी केलं.


...आणि 'सी रॉक' नामशेष झालं!

२०१०मध्ये नवीन हॉटेल बांधण्यासाठी म्हणून आधीची इमारत पूर्णपणे पाडण्यात आली. पण, अनेक विभागांकडून अपेक्षित परवानग्या मिळण्यात विलंब होऊ लागला. शिवाय इएचआयएल आणि आयटीसी वेलकम ग्रुपमध्ये सुरु असलेल्या कायदेशीर लढाईमुळे बॅण्डस्टॅण्डवरचं 'सी रॉक' उध्वस्त अवस्थेतच राहिलं.



३१ मजल्यांचं भव्य बांधकाम

अखेर द इंडियन हॉटेल्स कंपनीला 'सी रॉक' पुन्हा बांधण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. या ठिकाणी ३१ मजल्यांचं भव्य हॉटेल बांधण्यात येणार आहे. त्यात खालचे तीन मजले हे बेसमेंट असतील, त्यावर सहा मजले अमेनिटीजसाठी असतील, आणि ७व्या मजल्यापासून ३०व्या मजल्यापर्यंत रूम्स असतील. सर्वात वरच्या ३१व्या मजल्यावर स्विमिंग पूल असेल.

'मुंबई मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) ने ३० ऑक्टोबरला झालेल्या बैठकीमध्ये हॉटेलच्या बांधकामाला परवानगी देण्याबाबत चर्चा केली, तर १२ डिसेंबरला झालेल्या बैठकीमध्ये अंतिम मंजुरी दिली.

हे हॉटेल पुन्हा कधीपर्यंत बांधून होईल, याविषयी अद्याप माहिती मिळाली नसली, तरी या हॉटेलच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईचा इतिहास जिवंत होणार आहे, हे निश्चित!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा