Advertisement

दसऱ्याच्या दिवशीही ग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ


दसऱ्याच्या दिवशीही ग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ
SHARES

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने ग्राहक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडतील या आशेने सराफा बाजार, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते सकाळपासूनच सज्ज झाले. फुलांच्या तोरणांनी दुकाने सजली, सवलती देणारे बॅनर्स लावण्यात आले, विक्रेतेही ग्राहकांचे मन वळवण्यास तयार झाले. मात्र आधीच महागाई त्यात जीएसटीची भर यामुळे बहुतांश ग्राहकांनी संध्याकाळपर्यंत खरेदीकडे पाठच फिरवली. परिणामी ग्राहकांच्या प्रतिक्षेत असलेली दुकाने सुनीसुनी दिसत होती.


सराफा बाजाराची निराशा

दसऱ्याच्या मुहूर्तावर हमखास सोने खरेदी केली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्वेलर्सनी विविध योजना सुरू केल्या आहेत. कोणी घडणावळीवर १० ट्कके सूट दिली आहे. तर कोणी दागिन्यांच्या खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत देत आहे. अशा आकर्षक योजना असूनही ग्राहकांनी सोने खरेदीला म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा भाव २९ हजार रूपयांवर गेला आहे.



दसरा असूनही आज सकाळपासून अपवादानेच ग्राहक दुकानात येत आहेत. म्हणावी तशी विक्री झालेली नाही. यावर्षी सोन्याचा भाव २९ हजार असल्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. दागिन्यांपेक्षा सोन्याचे नाणे खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. ५० हजारांवरील दागिन्यांवर जीएसटी लागू होत असल्याने ५० हजारांच्या आतील दागिन्यांची खरेदी ग्राहक करत आहेत.

- धवल कांबळे, लागू बंधू ज्वेलर्स


वाहन खरेदीही मंदावली

सोने खरेदी प्रमाणेच वाहन खरेदीलाही दसऱ्याच्या मुहूर्तावर 'किक स्टार्ट' मिळतो. दुचाकी आणि चारचाकींची दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी होते किंवा आधी नोंदणी झालेली वाहने घरी नेली जातात. परंतु यंदा वाहन खरेदीलाही तितकासा प्रतिसाद मिळताना दिसला नाही.  



गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांच्या बुकिंगचे प्रमाण कमी अाहे. आम्ही यावर्षीही ऑफर्स दिल्या होत्या. मात्र तितकासा प्रतिसाद ग्राहकांकडून मिळाला नाही. त्यामुळे आमची निराशा झाली आहे.

- रवीश वर्मा, व्यवस्थापक, मोदी ह्युंदाई 


गृह खरेदी नकोच

मुंबईत स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र दिवसेंदिवस घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे यंदाही दसऱ्याच्या मुहूर्ताकडे गृहखरेदीदारांनी पाठ फिरवली आहे. मुंबईत घर घेणे आवाक्याबाहेर गेल्याची प्रतिक्रीया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहेत.



गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घर खरेदीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. शहरात मोठ्या संख्येने तयार घरे पडून आहेत. तरीही ही घरे खरेदी करायला ग्राहक पुढाकार घेताना दिसत नाहीत. मुंबईच्या तुलनेत उपनगरांमध्ये घर खरेदीला जास्त मागणी आहे.

- आनंद गुप्ता, अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन


इलेक्टॉनिक वस्तूंना जेमतेम प्रतिसाद

सोने, गृह आणि वाहन खरेदीच्या तुलनेत इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळताना दिसला. सर्वसामान्य ग्राहक दसऱ्याच्या मुहूर्तावर मोबाईल, टीव्ही, वॉशिंगमशीन खरेदी करताना दिसून आले.


यावर्षी इलेक्ट्राॅनिक वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाला. दरवर्षी मोबाईल खरेदी मोठ्या प्रमाणात होते. मात्र यावर्षी एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन खरेदी ग्राहक मोठ्या प्रमाणावर करत आहेत. मात्र तरीही हा प्रतिसाद गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे.

- नितीन पांड्या, मॅनेजर, विजय सेल्स



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा