Advertisement

पीएनबीत ११ हजार कोटींचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे ३ हजार कोटी पाण्यात


पीएनबीत ११ हजार कोटींचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे ३ हजार कोटी पाण्यात
SHARES

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँके(पीएनबी)त कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खुलासा बुधवारी 'पीएनबी'ने केला. बँकेच्या मुंबई शाखेतून १.८ अब्ज डाॅलर (११,३३० कोटी रुपये) चा घोटाळा (फ्राॅड आणि अनआॅथराईज्ड ट्रान्झॅक्शन) झाल्याची माहिती बँकेने मुंबई शेअर बाजाराला दिली. ही माहिती बाहेर येताच 'पीएनबी'चे शेअर्स ७.८२ टक्क्यांनी खाली घसरले.

या प्रकरणानंतर बँकिंग सचिव राजीव कुमार एका वृत्तवाहिनीकडे प्रतिक्रिया नोंदवताना म्हणाले की, पीएनबीच्या १० कर्मचाऱ्यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आलं असून सीबीआय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.


शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले

यासंदर्भात मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, काही ठराविक खातेधारकांना फायदा पोहोचवण्यासाठी पैशांचं बेकायदेशीर हस्तांतर झालं. या हस्तांतराच्या आधारे दुसऱ्या बँकांनी या खातेधारकांना परदेशात आगाऊ (अॅडव्हांस) स्वरूपात पैसे दिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी बँकेची अंतर्गत समिती करत आहे. परंतु हा प्रकार समोर येऊन बँकेचे शेअर्स ८ टक्क्यांपर्यंत खाली घसरले. यामुळे गुंतवणूकदारांच्या किमान ३ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

बँकेने भलेही घोटाळा करणाऱ्या खातेधारकांची नावं उघड केलेली नसली, तरी यासंदर्भातील संपूर्ण माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना पुरवली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कुणाचं किती नुकसान झालं याचा तपशील मिळू शकेल, असं बँकेने स्पष्ट केलं.


नीरव मोदी प्रकरणाशी तारा?

तपास यंत्रणेनं हिरे व्यापारी नीरव मोदी, त्याचा भाऊ, पत्नी आणि एक पार्टनरविरोधात पीएनबीने सीबीआयकडे केलेल्या दोन तक्रारीवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. कारण हा संशयास्पद व्यवहार किमान १० हजार कोटी रुपयांचा आहे. हे प्रकरण २०११ चं आहे. ज्यात फ्राॅड लेटर आॅफ अंडरस्टँडिंग अंतर्गत पैशांची अफरातफर करण्यात आली होती.


बँकांना धक्का

आधीच सरकारी बँक बुडीत कर्जाच्या (एनपीए) समस्येशी झुंज देत असताना एखाद्या बँकेतील आर्थिक घोटाळा बाहेर येणं, हा सरकारी बँकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. केवळ डिसेंबर महिन्यावर नजर टाकल्यास याच एका महिन्यात सरकारी बँकांचा 'एनपीए' ३४.५ टक्क्यांनी वाढला आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा