Advertisement

स्वस्त कर्जासाठी आणखी प्रतिक्षा, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर स्थिर


स्वस्त कर्जासाठी आणखी प्रतिक्षा, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर स्थिर
SHARES

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने द्विमासिक पतधोरण जाहीर करताना व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्वस्त कर्जासाठी ग्राहकांना आता फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे रेपो रेट ६ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्क्यांवर स्थिर राहणार आहेत.


५-१ ने घेतला निर्णय

पतधोरण आढावा समितीतील एकूण ६ पैकी ५ सदस्यांनी व्याजदरांत कुठलाही बदल न करण्याच्या बाजूने मत दिलं. तर केवळ एका सदस्याने पाॅलिसी रेटमध्ये २५ बेसिस पाॅईंट कपात करण्याची सूचना केली. पतधोरण आढावा समितीची या नंतरची बैठक ६ फेब्रुवारी २०१८ ला होणार आहे.भडकू शकते महागाई

शेतकरी कर्जमाफी, पेट्रोलियम उत्पादनांवरील उत्पादन शुल्क, व्हॅटमध्ये घट आणि अनेक वस्तूंच्या जीएसटी दरांत केंद्र सरकारने केलेल्या कपातीमुळे वित्तीय तूट वाढू शकते. परिणामी देशभरात महागाई भडकू शकते, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. सप्टेंबरमध्ये महागाई कमी झाली असली, तरी आॅक्टोबरमध्ये महागाईने ७ महिन्यांतील उच्चांक गाठला होता. मागील २ महिन्यांत फळ, भाज्यांच्या उत्पादनात सातत्य नसल्याने महागाईतही चढ उतार पहायला मिळाला.


आधीच्या व्याजदर कपातीचा फायदा द्या

पतधोरण अहवाल सादर करताना आरबीआय गव्हर्नर डॅ. उर्जित पटेल म्हणाले, प्रायमरी कॅपिटल मार्केटमध्ये भांडवल गोळा करण्याच्या प्रयत्नांमध्ये सुधारणा झाली आहे. या भांडवलाच्या आधारे येत्या काळात नवीन उद्योग सुरू होतील. यामुळे कमी वेळेत मागणी वाढून अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लागू शकतो. त्यामुळे यापूर्वी करण्यात आलेल्या व्याजदर कपातीचा फायदा आधी ग्राहकांना पूर्णपणे द्या, अशी सूचनाही रिझर्व्ह बँकेने सरकारी आणि खासगी बँकांना केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा