Advertisement

सर्वसामान्यांची निराशा, व्याजदर 'जैसे थे'च राहणार


सर्वसामान्यांची निराशा, व्याजदर 'जैसे थे'च राहणार
SHARES

रिझर्व्ह बँकेने द्विमासिक पतधोरण सादर करताना व्याजदर पुन्हा एकदा स्थिर ठेवले आहेत. यामुळे व्याजदरात काही प्रमाणांत दिलासा मिळेल, अशी आशा लागून राहिलेल्या सर्वसामान्यांची मोठी निराशा झाली आहे. रिझर्व्ह बँकेने सलग तिसऱ्या पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत. यामुळे रेपो रेट ६ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ५.७५ वर कायम असणार आहे.

पतधोरण आढावा समिती (एमपीसी)तील सहापैकी पाच सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याच्या बाजूने मतदान केलं. तर केवळ एकाच सदस्याने व्याजदर घटवण्याच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पतधोरण आढावा समितीने प्रामुख्याने महागाई दर ४ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचं लक्ष्य गाठण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी स्पष्ट केलं.  तर चौथ्या तिमाहीत महागाई दर ५.१ टक्क्यांच्या जवळपास राहण्याची शक्यताही व्यक्त केली.


कधी घटले होते व्याजदर?

यापूर्वी आॅगस्ट २०१७ मध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. कपातीनंतर रेपो रेट ६ टक्क्यांवर आला. २०१८-१९ मध्ये वित्तीय तूट वाढण्याचा अंदाज असल्याने आरबीआय व्याजदरांत कपात करेल, ही शक्यता तशी कमीच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


काय म्हणाले गव्हर्नर?

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पतधोरण आढावा अहवालात नमूद केलं आहे की, देशातील आर्थिक घडामोडी गती पकडत आहेत. अशा स्थितीत वाढत्या उत्पादन खर्चाचं ओझं ग्राहकांच्या डोक्यावर लादण्यात येऊ शकतं. परिणामी वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश हे माॅन्सूनवर अवलंबून असून येणारा माॅन्सून सर्वसामान्य असू शकतो, असा अंदाज आहे.

हा सगळा ताळमेळ पाहता आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील पहिल्या सहामाहीत किरकोळ महागाई ५.१ टक्के ते ५.६ टक्के राहील, असा अंदाज आहे. तर दुसऱ्या सहामाहीत घाऊक महागाई ४.५ टक्के ते ४.६ टक्के राहील, असा अंदाज आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा