
भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्टच्या रात्री ही घटना समोर आली. त्यानंतर 24 ऑगस्टपासून संबंधितांना आजाराची लक्षणे जाणवू लागली.
मोमोज खाल्ल्यानंतर संबंधितांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही रुग्णांना ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचीही लक्षणे आढळून आली.
आजारी पडलेल्या 16 जणांमध्ये लहान मुलांसह किशोरवयीन आणि प्रौढांचाही समावेश आहे. यामध्ये 3 ते 13 वर्षे वयोगटातील पाच मुलांचा समावेश आहे. तर OPD मध्ये उपचार घेतलेल्या दोघांचे वय 13 आणि 14 वर्षे आहे.
डॉक्टरांनी रुग्णांच्या लक्षणांनुसार त्यांची तपासणी करून उपचार केले. सध्या सात रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर इतर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गरजेनुसार नियमित तपासण्या आणि फॉलोअप करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
घटनेनंतर मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांनी भाभा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून रुग्णांच्या प्रकृतीची तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती घेतली.
भांदिरगे यांनी घटनेची सविस्तर माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधितांनी खाल्लेल्या अन्नाची तपासणी तसेच अन्न दूषित झाले होते का किंवा अन्न हाताळताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास केला जाण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असली तरी तपासणीनंतरच विषबाधेचे नेमके कारण आणि पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा
