Advertisement

पालिका कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा लागू होणार

लवकरच पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येक शनिवार-रविवार सुट्टी मिळण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा लागू होईल.

पालिका कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा लागू होणार
SHARES

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा (Five Days Week) लागू झाला आहे. आता मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) कर्मचारी (Employees) ५ दिवसांचा आठवडा लागू कधी लागू होईल या प्रतिक्षेत आहेत. मात्र, आता लवकरच पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येक शनिवार-रविवार सुट्टी मिळण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा लागू होईल. 

महापालिकेच्या कामगार विभागाने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यावर आता पालिका आयुक्तांची स्वाक्षरी होण्याची औपचारिकता बाकी आहे. या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५ दिवसाचा आठवडा लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारसोबतच निमशासकीय आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी होत होती. राज्य सरकारने २४ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्याची अंमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून केली जात आहे. आता सरकारी कार्यालये सोमवार ते शुक्रवार खुली राहणार असून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सरकारी कार्यालय बंद राहणार आहेत. पालिका आयुक्तांच्या शिक्कामोर्तबानंतर मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनाही वीकेंडला सुट्टी मिळणार आहे.

५ दिवसांचा आठवडा लागू झाल्यावर पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत काम करावे लागणार आहे. पालिकेत ड वर्गात काम करणारे शिपाई, हमाल, कामगार यांना सकाळी ९.३० ते ६.३० पर्यंत काम करावे लागणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत केवळ अर्धा तास जेवणाची सुट्टी मिळणार आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ ८ नैमित्तिक रजा मिळणार आहेत. या रजा इतर रजांना मिळून घेता येणार आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना ५ दिवसांच्या आठवड्याचा फायदा मिळणार नाही. ज्या कार्यालयात रोटेशन पद्धतीने सुट्टी दिली जात होती, त्या कार्यालयांचे कामकाज सुरळीत चालू राहावे म्हणून खाते प्रमुख, उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या परवानगीने कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात याव्यात असे पत्रकात म्हटले आहे.



हेही वाचा -

बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी भाजप नेते नरेंद्र मेहता हायकोर्टात

महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी ४८ विशेष न्यायालय स्थापन करणार - अनिल देशमुख




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा