Advertisement

राणीबागेसह पेंग्विन दर्शन 50 रुपयांमध्येच!


राणीबागेसह पेंग्विन दर्शन 50 रुपयांमध्येच!
SHARES

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयासह पाहुण्या पेंग्विनच्या दर्शनासाठी आता केवळ 50 रुपये एवढेच शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, पालक आणि दोन मुलांना आकारण्यात येणारे 100 रुपयांचे शुल्क कायम ठेवत त्यांच्यासोबत असलेल्या 12 वर्षांवरील पाचव्या माणसाला केवळ 50 रुपये एवढेच शुल्क आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. भाजपाने या प्रस्तावाला विरोध दर्शवला असला तरी प्रत्यक्षात समितीत त्यांच्या गटनेत्यांना भूमिका योग्यप्रकारे मांडता आली नाही. परिणामी जॉगिंगला येणाऱ्या नागरिकांच्या मुद्यावर भाजपाला योग्य बाजू लावून धरता न आल्यामुळे शुल्क कमी करत विरोध करणाऱ्या भाजपाचा रंग काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने प्रस्ताव मंजूर करत उतरवला.

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे अर्थात राणीबागेचे प्रवेश शुल्क आणि इतर शुल्कात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार विद्यमान 5 रुपये शुल्कात वाढ करत प्राणिसंग्रहालय आणि हॅम्बोल्ट पेंग्विन सुविधा आदींसाठी 12 वर्षांवरील सर्वांसाठी शंभर रुपये तर 3 ते 12 वर्षांमधील मुलांसाठी 25 रुपये आणि आईवडील व 12 वर्षांआतील दोन मुले सोबत असल्यास त्या कुटुंबाकडून सरसकट शंभर रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता सभागृहनेते यशवंत जाधव यांनी उपसूचनेद्वारे 100 रुपयांऐवजी 50 रुपये एवढे शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच पालक आणि दोन मुलांसह 12 वर्षांवरील कोणी आल्यास त्यालाही प्रत्येकी 50 रुपये एवढेच शुल्क आकारण्याची मागणी केली. पेंग्विन पक्षी राणीबागेत येण्यापूर्वी वर्षाला 8 लाख पर्यटक येत असत. परंतु आता अडीच वर्षात 40 लाख पर्यटक राणीबागेला भेट देऊन गेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात शुल्कवाढ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 


हेही वाचा - 

पेंग्विनसाठी 50 रुपये आणि राणीच्या बागेसाठी 20 ते 25 रुपयांचे शुल्क?

पेंग्विनच्या विशेष कक्षाला तडे


यावर भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी याचा समाचार घेत गटनेत्यांच्या दोन सभांमध्ये आपण उपस्थित नव्हतो, याचे पुरावे देत पेंग्विन सोडून राणीबागेचा विकास झाल्यावर रेट वाढवा अशी सूचना केली. पेंग्विनसाठी शंभर रुपयांचा शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने गटनेत्यांच्या मान्यतेनुसार घेतला होता. परंतु याला भाजपाने विरोध केल्यानंतर आज शिवसेनेला शुल्क कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. पेंग्विन पाहण्यासाठी येणारे पर्यटक नियंत्रणात ठेवण्यासाठी ही शुल्कवाढ करण्यात येत असेल तर त्याला आपला विरोध असून, याठिकाणी जॉगिंगला येणाऱ्या नागरिकांना आपण कोणतीही सुविधा देत नसल्यामुळे त्यांना कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी केली. परंतु यासाठी स्वत: कोटक यांनी उपसूचना न मांडता यशवंत जाधव यांनीच यासाठी आणखी एक उपसूचना मांडावी, असे सांगत राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला.

बोटॅनिकल गार्डनचा पूर्ण विकास होत नाही, तोपर्यंत शुल्कवाढ करू नये, अशी सूचना समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली. मुंबईतील सुमारे 60 हून अधिक उद्याने आणि मैदाने संस्थांच्या ताब्यातून घेण्यात आलेली नाहीत. या उद्यानांच्या जागांमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश दिला जातो का? यासाठी किती शुल्क आकारले जाते? मग संस्थांच्या ताब्यातील उद्याने, मैदानांच्या जागांमध्ये नि:शुल्क प्रवेश द्यावा म्हणून कोणी आवाज उठवत नाही आणि राणीबागेतील काही क्षुल्लक वाढीसाठी बोंबलत आहेत, हे योग्य नाही. सभागृहनेत्यांनी केलेली सरसकट 50 रुपये एवढ्या शुल्काची मागणी योग्य असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जॉगिंगला येणाऱ्या लोकांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत फेरविचार करावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पेंग्विन आणि राणीबागेसाठी वेगवेगळा शुल्कवाढीचा प्रस्ताव आणावा तसेच संध्याकाळी जॉगिंगला येणाऱ्या नागरिकांना जे बंद करण्यात येणार आहे, त्याबाबतही प्रशासनाने विचार करावा, अशी सूचना केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी उपसूचना मतास टाकली. याला भाजपाचे मनोज कोटक, प्रभाकर शिंदे यांनीच विरोध दर्शवला. भाजपाच्या अन्य सदस्यांच्या लक्षातही ही बाब आली नाही. त्यामुळे त्यानंतर अध्यक्षांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अखेर भाजपा आणि समाजवादी पक्षाने सभात्याग करत निषेध व्यक्त केला. या प्रस्तावाला भाजपाने केवळ नाममात्र विरोध दर्शवला असून, एकप्रकारे या शुल्कवाढीमागे स्वत:ला नामनिराळे ठेवण्याचा प्रयत्न भाजपाने केल्याचे दिसून येत आहे. मात्र, याचा फायदा शिवसेनेने, काँग्रेसला हाताशी धरून उठवतानाच पहारेकऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा