Advertisement

मुंबईत ९७ खतनिर्मिती प्रकल्प सुरु


मुंबईत ९७ खतनिर्मिती प्रकल्प सुरु
SHARES

मुंबईत २ ऑक्टोबरपासून मोठ्या सोसायट्यांना कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट लावण्याची महापालिकेने सक्ती केल्यानंतर गांधी जयंतीदिनी शहरात ९७ खत निर्मिती प्रकल्प सुरु झाले आहेत. महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून संबंधित ५ हजार ३०४ सोसायट्यांना या नियमाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ३७३ सोसायट्यांमध्ये गेल्या ४ महिन्यांच्या कालावधीत कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरु होते. त्यात आणखी ९७ प्रकल्पांची भर पडली आहे. ९७ प्रकल्प सोमवारी गांधी जयंतीच्या निमित्ताने सोसायट्यांच्याच स्तरावर सुरु झाल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.


सर्व सोसायट्यांचे कौतुक

२ ऑक्टोबरपासून कचरा विल्हेवाटीला सुरुवात करण्यात येणार असल्यामुळे गांधी जयंतीच्या दिनी मुंबईतील अनेक विभाग कार्यालयांच्या हद्दीतील बहुतांशी गृहनिर्माण सोसायटी तसेच व्यावसायिक संकुलांनी कचरा विल्हेवाटीसाठी पुढाकार घेत प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे)  आय. ए. कुंदन, अतिरक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)  विजय सिंघल व अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड यांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणाऱ्या सोसायट्यांना भेटी देऊन संबंधित सोसायट्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महापालिकेच्या ७ परिमंडळांच्या संबंधित उपायुक्तांनी व सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी देखील आपापल्या परिसरातील सोसायट्यांना भेटी देऊन सोसायट्यांच्या कचरा व्यवस्थापन विषयक कामांचे कौतुक केले आहे.




नेहरु नगरमध्ये दररोज २०० किलोचे खत

जुहू-विलेपार्ले परिसरातील सुमारे २५ ते ३० हजार लोकवस्तीच्या नेहरु नगर झोपडपट्टी परिसराजवळ महापालिकेच्या पुढाकाराने आणि 'दत्तक वस्ती योजने'तील स्वयंसेवकांच्या मदतीने दररोज सुमारे २०० किलो ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भेट दिली. या ठिकाणी दररोज २ हजार किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून झोपडपट्टीमध्ये शून्य कचरा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी शक्य होईल, असा विश्वास के/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.




बीएसएनएलनेही घेतला पुढाकार

सांताक्रूज पश्चिम परिसरात भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) मुख्यालय व निवासी परिसर आहे. १ लाख ३७ हजार चौरस मीटर आकाराच्या या भूखंडावर कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पाहणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली. सहायक आयुक्त एच-पश्चिमचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला आहे.


अंधेरी, जोगेश्वरी पूर्वमध्ये ४१ सोसायट्यांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट

जी/उत्तर विभागातील लोकमान्य नगर सोसायटी, बेलसॉर सोसायटी, भारी नगर, अवर लेडी ऑफ वेलंकनी, दांडेकर निवास तसचे नित्य सहाय्य आदी सहा सोसायट्यांमध्ये खत निर्मिती प्रकल्प सुरु झाले.  महापौर विश्वनाथ  महाडेश्वर यांच्या हस्ते  या प्रकल्पांचे उद्घाघाटन झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त आनंद वाघ्राळकर, सहायक आयुक्त रमाकांत बिरादर आदी उपस्थित होते. के-पूर्व विभागात ४१ सोसायट्यांमध्ये खत निर्मिती प्रकल्प सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या सर्व सोसायट्यांचा महापालिकेच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.




तृतीयपंथीयांची केली चौपाटीची स्वच्छता

शिवाजीपार्क येथील समुद्र चौपाटीवर कचरा साफ करून तृतीयपंथीयांनी स्वच्छता मोहीम राबवली. गांधी जयंतीचे औचित्य साधून ६ ते ७ तृतीयपंथीयांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन चौपाटीचा सर्व परिसर स्वच्छ केला.



हेही वाचा -

अजिंक्यने बीकेसीत केली स्वच्छता, पंतप्रधानांच्या आवाहनाला साद



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा