Advertisement

…तर अजोय मेहतांच्या घराबाहेर कचरा टाकू


…तर अजोय मेहतांच्या घराबाहेर कचरा टाकू
SHARES

20 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या जागेवरील सोसायटींनी आपल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःच लावावी, असे फर्मान सोडणाऱ्या आयुक्तांनी आपले परिपत्रक त्वरित मागे घ्यावे. अन्यथा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या घराबाहेर आणि महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये कचरा फेकण्यात येईल, असा इशारा महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी दिला आहे. 

शहरात निर्माण होणारा कचरा उचलणे आणि त्यांची विल्हेवाट लावणे हे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्य महापालिका पार पाडत नाही आणि सोसायटींवर दादागिरी करत आहे, हे कदापी खपवून घेणार नाही, असाही इशारा नगरसेवकांनी दिला.


जनतेवर दादागिरी

मुंबईतील मोठ्या सोसायटींचा कचरा येत्या २ ऑक्टोबरपासून उचलणे बंद करण्याचे फर्मान महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जारी केले आहे. हे परिपत्रक बेकायदा असून ते त्वरीत मागे घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी निवेदनाद्वारे केली आहे. महापालिका प्रशासन स्वत: कचरा उचलून त्यांची विल्हेवाट लावत नाही आणि जनतेवर मात्र, दादागिरी करत आहे. 

महापौर तथा कोणत्याही गटनेत्याशी चर्चा न करता आयुक्तांनी परस्पर हे परिपत्रक काढून एक प्रकारे कायद्याचे उल्लंघनच केल्याचे सांगत राजा यांनी खत निर्मिती प्रकल्पाच्या मशिनचा धंदा करण्यासाठीच हे परिपत्रक काढल्याचा आरोप केला. नगरसेवक म्हणून निवडून येऊन चार महिने झाले तरी कचरापेट्यांचा पत्ता नाही. मग या सोसायट्यांना कचरापेट्या कुठून द्यायचा, असा सवाल त्यांनी केला. कोणत्याही सेवा सुविधा न देता अशाप्रकारे सक्ती करण्याच्या या परिपत्रकाचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.


आधी उपाययोजना मग करा सक्ती

सन २०१४ मध्ये कचऱ्याची जी परिस्थिती होती, तीच आजही आहे. यात कोणतीही सुधारणा झालेली नाही, असे सांगत भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी महापालिका स्वत: शास्त्रोक्तपणे कचऱ्याची विल्हेवाट लावते का? मग स्वत:च्या अपयशाचे खापर आणि जबाबदारी जनतेवर का टाकायची? असा सवाल केला. आधी प्रशासनाने उपाययोजना राबवाव्यात मगच अशाप्रकारची सक्ती करावी. त्यामुळे हे परिपत्रक त्वरीत मागे घ्यावे, अन्यथा सोसायट्यांमधील कचरा विभाग कार्यालयांच्या बाहेर आणू टाकला जाईल, असा इशारा कोटक यांनी दिला.


तर अधिकाऱ्यांना फिरणेही जड जाईल

घनकचरा विभागात अनागोंदी कारभार सुरु असल्याचे सांगत सपाचे गटनेते रईस शेख मुलुंड व देवनारमधील मोठ्या प्रकल्पांसाठी छोट्या प्रकल्पांच्या फाईली दाबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाने, नगरसेवकांच्या संतापाची वाट पाहू नये. जर या सभागृहातील २३२ नगरसेवक विभागात उभे राहिले तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फिरणेही अवघड होईल, असा इशारा त्यांनी  दिला. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी हे परिपत्रक मागे घेण्याची मागणी करत आयुक्त जर कोणालाच विश्वासात न घेता काम करत असतील तर भविष्यात मोठ्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.


आयुक्त सांगतात, नगरसेवकांचे ऐकू नका

दोन-चार नगरसेवक वगळले तर आयुक्त कोणाचेच ऐकत नाही. नगरसेवकांचे ऐकायचे नाही, असेही ते अधिकाऱ्यांना सांगत आहेत, असे सांगत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी हे परिपत्रक जर आयुक्त् मागे घेणार नसतील तर विभागांमधील कचरा सनदी अधिकाऱ्यांच्या घरात तसेच आयुक्तांच्या घराबाहेर आणून टाकला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

हा कचरा उचलला न गेल्यास  दुर्गंधी पसरेल. त्यामुळे आजार पसरतील. त्यामुळे एकप्रकारे नागरिकांना मारण्याचाच आयुक्तांचा डाव असल्याचाही आरोप यशवंत जाधव यांनी केला. त्यामुळे याचा निषेध म्हणून हे कामकाजच तहकूब करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे प्रशासनाच्या निवेदनापूर्वीच महापौरांनी सभेचे कामकाज तहकूब केले. यावेळी झालेल्या चर्चेत भाजपाच्या नगरसेवकांना बोलू न दिल्यामुळे त्यांनी सभात्याग केला होता. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ आणि काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी चर्चेत भाग घेतला होता.



हेही वाचा -

मुख्यमंत्र्यांना झाडू मारण्यासाठी चकाचक मंडईत टाकला कचरा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा