Advertisement

५ वर्षांच्या चिमुरडीला खेचून भटक्या कुत्र्यांनी जंगलात नेलं, तरूणाने वाचवले प्राण

अंधेरीच्या मरोळ परिसरात एक ५ वर्षांची मूकबधीर चिमुरडी भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडली. भटके कुत्रे तिचे लचके तोडत असताना मंगेश शेगर नावाच्या तरूणाने हा भयंकर प्रकार बधितला. त्याने तात्काळ या ठिकाणी धाव घेत, कुत्र्यांच्या तावडीतून चिमुरडीला सोडवलं.

५ वर्षांच्या चिमुरडीला खेचून भटक्या कुत्र्यांनी जंगलात नेलं, तरूणाने वाचवले प्राण
SHARES

मुंबईत भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रात्रीच्या वेळेस भटकी कुत्री अंगावर धावून येणं, क्वचितप्रसंगी चावणं असे एक ना अनेक प्रकार मुंबईच्या कानाकोपऱ्यात दररोज घडतच असतात; पण रविवारी रात्री घडलेला प्रसंग वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अंधेरीच्या मरोळ परिसरात एक ५ वर्षांची मूकबधीर चिमुरडी भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडली. भटके कुत्रे तिचे लचके तोडत असताना मंगेश शेगर नावाच्या तरूणाने हा भयंकर प्रकार बधितला. त्याने तात्काळ या ठिकाणी धाव घेत, कुत्र्यांच्या तावडीतून चिमुरडीला सोडवलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करत तिचे प्राणही वाचवले.


बघा, असं वाचवलं चिमुरडीला


नेमकं काय झालं?

अंधेरीच्या मरोळमध्ये राहणारा मंगेश परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. रविवारी रात्री मंगेशची रात्रपाळी होती. रात्री ११ वा. जेवण उरकून मंगेश इमारत परिसरात फेऱ्या मारत होता. त्यावेळी इमारतीपासून हाकेच्या अंतरावरील जंगलात १५ ते २० कुत्र्यांचं टोळकं कुणावर तरी हल्ला करत असल्याचं त्याला दिसलं. सुरूवातीला कुत्र्याच्या लहान पिल्लावर इतर कुत्रे हल्ला करत असावे, असं मंगेशला वाटलं. हातात काठी घेऊन मंगेश त्या ठिकाणी धावला. हातातील काठीच्या धाकावर त्याने कुत्र्यांना बाजूला केल्यानंतर जे दृष्य दिसलं ते पाहून त्याला धक्काच बसला.कुत्र्यांना पिटाळून लावलं

हृदय पिळवटून टाकणारं असं ते दृष्य होतं. कारण १५ ते २० कुत्री एका चिमुरडीचे लचके तोडत होते. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या या ५ वर्षीय मुलीला खाण्याच्या तयारीत हे टोळकं होतं. मात्र मंगेशने जिवाची पर्वा न करता या कुत्र्यांना तिथून पिटाळून लावलं. त्यानंतर मोठ्या हिंमतीने बेशुद्ध चिमुरडीला उचलून मंगेशने इमारतीजवळील रिक्षा स्टँडच्या दिशेने धाव घेतली.


रुग्णालयाकडे धाव

रात्री ११.३० वाजता रिक्षांची फारशी वर्दळ नव्हती. अशा स्थितीत एक रिक्षा चालक मंगेशच्या मदतीसाठी धावून आला. त्या दोघांनी चिमुरडीला तातडीने कूपर रुग्णालयात नेलं. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला रुग्णालय प्रशासनाने परळच्या के.ई.एम रुग्णालयात हलवलं. चिमुरडीवर योग्य उपचार होईपर्यंत मंगेश आणि रिक्षा चालक पहाटे ५ वाजेपर्यंत रुग्णालयात बसून होते. डाॅक्टरांनी मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितल्यानंतर मंगेश घरी आला.


चिमुरडी कोण?

अंजली नावाची ही चिमुरडी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील कामगाराची मुलगी असल्याचं समोर अालं अाहे. ही मुलगी मूकबधीर असल्यामुळे कुत्रे लचके तोडत असताना मदतीसाठी ती चिमुरडी ओरडू शकली नाही. मात्र देवदूताप्रमाणे धावून आलेल्या मंगेशने तिला मरणाच्या दारातून परत आणलं. याप्रकरणी अंधेरी पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा-

अभिनेता अरमान कोहलीची गर्लफ्रेंडला मारहाण, गुन्हा दाखल

आयपीएल बेटिंग: बुकी सोनू जलानला लावणार मकोका!Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement