Advertisement

प्रतिक्षानगरच्या रहिवाशांना खड्डेमुक्तीची प्रतिक्षा!

पहिल्याच पावसात प्रतिक्षानगरमधील कित्येक रस्ते उखडले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यावरून गाड्या कशा न्यायच्या नि चालालयं कसं असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. पावसाच्या पहिल्याच सरींना दणादाण उडालेल्या या रस्त्यांचा आढावा मुंबई लाइव्हनं घेतला.

प्रतिक्षानगरच्या रहिवाशांना खड्डेमुक्तीची प्रतिक्षा!
SHARES

म्हाडाची सर्वात मोठी वसाहत असलेल्या प्रतिक्षानगर येथील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सध्या एकच प्रश्न पडलाय, तो म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते. कारण पावसाच्या एका सरीतच प्रतिक्षानगरमधील रस्त्यांंची दुरवस्था झाली आहे.

जिकडे तिकडे खड्डे, उखडलेलं पेव्हर ब्लाॅक, माती, पाणी आणि चिखलानं माखलेले रस्ते, अशी एकंदर परिस्थिती प्रतिक्षानगरमधील रस्त्यांची आहे. मात्र त्याचवेळी या रस्त्यांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या पालिकेला रस्त्यांचं आणि नागरिकांचं काहीही देणघेणं नसल्याचं दिसून येत आहे.




परिस्थिती 'जैसे थेच'

प्रतिक्षानगर इथं म्हाडानं शेकडो इमारती बांधल्या असून हजारो कुटुंबीय येथे वास्यव्याला आहेत. कधी काळी वस्ती नसलेल्या या परिसरात आज लाखोंची लोकसंख्या आहे. मात्र येथे रस्त्यांची सुविधांचा पुरता बोजवारा उडालेला पाहायला मिळतो. प्रतिक्षानगरमधील रस्ते कधी काळी म्हाडाच्या ताब्यात होते. तेव्हाही रस्त्यांची अशीच दुरवस्था होती. मात्र आता पालिकेच्या ताब्यात गेल्यानंतरही रस्त्यांची दुरूस्ती काही होताना दिसत नाही.



आधीच खराब असलेल्या रस्त्यांची शनिवारी रात्री पडलेल्या पावसांच्या सरींनी पोलखोल केली आहे. पहिल्याच पावसात प्रतिक्षानगरमधील कित्येक रस्ते उखडले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यावरून गाड्या कशा न्यायच्या नि चालालयं कसं? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

पावसाच्या पहिल्याच सरींना दणादाण उडालेल्या या रस्त्यांचा आढावा 'मुंबई लाइव्ह'नं घेतला. त्यावेळी रस्त्यांची प्रचंड दुरवस्था असून लोकप्रतिनिधींसह पालिकेकडून रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं आहे.




प्रतिक्षानगरमधील जे रस्ते खराब आहेत ते रस्ते पावसाच्या पहिल्या सरीत खराब झालेले नसून दोन वर्षांपासून इथे अशीच परिस्थिती आहे. रस्ते खराब असल्यानं पाऊस पडला की रस्ते आणखीनच खड्ड्यात जातात नि नागरिकांची पंचाईत होते. पावसाळ्यात पालिकेचे कर्मचारी येतात नि थोडीशी डागडुजी करून जातात. पण काही दिवसांनी पुन्हा खड्डे पडतात.
- प्रकाश लालवाणी, दुकानदार


प्रतिक्षानगरचा परिसर बराच मोठा असून इथं बेस्ट आगार आहे. त्यामुळे येथील रस्त्यारस्त्यांवर गाड्यांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. पण रस्ते खराब असल्यानं या सर्वांच मोठ्या अडचणींतून रस्ता काढावा लागतो. काही ठिकाणी पालिकेकडून गेल्या चार महिन्यांपासून रस्त्यांचं काम सुरू असून या कामामुळंही नागरिकांना अडचणी येताना दिसत आहेत. हे काम पुढील १८ महिने चालणार असल्यानं नागरिकांना हा त्रास पुढेही असाच सहन करावा लागणार आहे.



पावसाळा असल्यानं काम बंद

याविषयी येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रकाश वाघधरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पालिकेकडे पाठपुरावा करत असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार पालिकेनं रस्त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं आहे. पण सध्या पावसाळा असल्यानं काम बंद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा - 

महापालिकेची खड्डयांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन

महापालिका आयुक्त मंगळवारी करणार कामांची पाहणी!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा